• Mon. Jun 15th, 2026

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कर्करोगतज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांची ७ जानेवारीपासून विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 5, 2026
    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कर्करोगतज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांची ७ जानेवारीपासून विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ०५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘दिलखुलास’ मध्ये ‘मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणे, निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

    ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

    डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळी, घसा, आवाज, लाळ ग्रंथी, नाक, सायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावर, गिळण्यावर, श्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवर, मुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, वेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

    ०००

    जयश्री कोल्हे/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed