Thane Dahi Handi Festival:गोपाळकाला अवघ्या एक दिवसांवर असताना. दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात ठिकठिकाणी दंहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. अगदी लाखोंची बक्षीस ठेवण्यात आली आहे. या उत्सवात मुंबईसह कोकणातून देखील गोविंदा सहभागी होणार आहेत.
रत्नागिरीचे गोविंदा पथक ठाण्यात
विशेष म्हणजे, पनवेल, पेण, अलिबाग, महाड ते थेट रत्नागिरीचे गोविंदा पथक पथकांचे कौशल्य सादर करण्यासाठी ठाण्यात सकाळपासूनच दाखल होणार असल्याने गोविंदांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. या उत्सवाचे आयोजन मुख्यत्वे भर रस्त्यात होणार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
ठाण्यात उत्सव आयोजकांची संख्या वाढली
दहीहंडी उत्सवाची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात राजकीय पक्ष, संघटनांकडून उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवातील आयोजकांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भर पडली. पूर्वी पारंपरिक आणि निवडक राजकीय पक्षांकडून शहरात साजरा होणारा हा उत्सव आता विविध भागांतील अंतर्गत रस्ते, चौक आणि मोठ्या गृहसंकुलांच्या आवारात पोहचला आहे.
गोविंदा पथक ठाण्याकडे रवाना
गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदा त्यातही काही प्रमाणात घट झाल्याने ठाण्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथक ठाण्याकडे कूच करणार आहेत.
‘गोविंदांचे गोकुळ ‘अवतरणार
टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवासह येथून हाकेच्या अंतरावर जांभळी नाका येथे शिवसेनानेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजन विचारे आयोजित महादहीहंडी उत्सव आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
Dahi Handi 2026: ठाण्यात दहीहंडीचे राजकीय थर, वागळेतील कामगार नाक्यावर शिवसेना-भाजपमध्ये आयोजनाची चुरस
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने दहीहंडी उत्सव
नौपाडा येथील विष्णूनगर परिसरात भगवती शाळेच्या मैदानात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने दहीहंडी उत्सव होणार असून रघुनाथ नगर येथे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
वर्तकनगरात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव होत असून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने स्वामी प्रतिष्ठान आयोजित उत्सवालाही नामांकित गोविंदा पथक हजेरी लावणार आहेत.
Thane News : ठाण्याच्या गोविंदा पथकांचा मुंबईत बोलबाला ; सरावातच सलग तिसऱ्यांदा रचले नऊ थर
भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन
कॅसल मिल येथे शारदा संकल्प प्रतिष्ठानची गोकुळहंडी उभारण्यात येणार आहे. भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन केले आहे. साई जलाराम प्रतिष्ठान व शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांच्या वतीने बाळकूम नाका परिसरात, रेमंड गृहसंकुल युवा स्टार प्रतिष्ठान, रामचंद्र नगर श्री साई श्रद्धा सेवा समिती, कामगार नाका एकनाथ भोईर फाउंडेशन, इंदिरानगर दादुभाई शेख, टिकुजिनी वाडी चौक नवयुग मित्र मंडळ अशा विविध आयोजकांच्या दहीहंडी उत्सवाने ठाण्यात ‘गोविदांचे गोकुळ’ पाहायला मिळणार आहे.
