पुण्यातील शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर यांनी आज अचानक अजित पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर पुण्यात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची युती होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी धंगेकर यांनी शिवसेनेच्या जागांचा प्रस्ताव त्यांना दिल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभार चर्चा झाली. या चर्चेनंतर रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवारांनी युतीसाठी ग्रीन सिग्नल दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण आज रात्री दोन्ही पक्षांचे नेते चर्चेसाठी बसणार असल्याचीदेखील माहिती त्यांनी दिली.
‘राज्यात एकत्र त्यामुळे…’
“अजित पवार यांना आम्ही भेटलो. माझ्यासोबत आमच्या पक्षाचे पदाधिकारी होते. आम्ही कुठल्या जागाचा प्रस्ताव दिलेला नाही. आता आम्ही त्यांना फक्त भेटलो आहोत. बोललो आहोत. परत आमची रात्री चर्चा होणार आहे. अजून आमची चर्चा झालेली नाही. पण आम्ही भेटायला आलो आहोत. आपण राज्यात एकत्र आहोत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण एकत्र बसू शकतो का? एवढचं आमचं बोलणं झालं आहे”, असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं.
“निवडणूक असली तरी ही सदिच्छा भेट आहे. तसेच अजूनही युतीबाबत स्पष्टता आलेली नाही. माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनतर आम्ही अजित पवार यांना भेटायला आलो. अजित पवार यांच्यासोबत आम्ही चर्चा करायचा प्रयत्न केला. पण अजित पवार एका बैठकीत बिझी होते. आम्ही अजित पवारांना भेटलो. गप्पा मारल्या. मी अजित पवारांना सांगितलं की, तुम्ही आणि आम्ही एकत्र येत असू तर आपल्याला काय करता येईल? अजून अजित दादांनी ग्रीन सिग्न दिलेला नाही”, अशी महत्त्वाची माहिती धंगेकर यांनी दिली.
“आमची युतीची स्पष्टता अजून झालेली नाही. अजित दादा काय म्हणतात याबाबत त्यांचा निरोप आम्हाला आज संध्याकाळी मिळेल. तसेच मला पक्षाने अजित पवार यांना भेटण्याची सूचना दिलेली नव्हती. मी स्वत: अजित पवार यांच्या भेटीला आलो आहे. मी अजित पवार यांच्या भेटीला नेहमी येत असतो. अजित पवार यांच्यासोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“आमचा एबी फॉर्म अजून कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेला नाही. सकाळपर्यंत सर्व उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचेल. विजय शिवतारे यांनी काय प्रस्ताव दिला? ते मला माहिती नाही. पण आम्ही अजित पवारांना भेटलो. अजित पवार म्हणाले, संध्याकाळी याबाबत बोलतो”, अशी देखील माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली.
