मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना रंगणार आहे. भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात ६६ जणांची नावं आहेत.
धारावीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १८५ मधून रमेश नाडर यांना तिकीट मिळेल, असं भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वाटत होतं. पण पक्षानं अनपेक्षित निर्णय घेतल्यानं पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रवी राजा यांना तिकीट देण्यात आलेले कार्यकर्ते संतापले. त्यांनी दादर येथील भाजप कार्यालयात गोंधळ घातला.
झटपट पटापट! शिंदेंना तिकीट मिळताच पाटील मातोश्रीवर; AB फॉर्म घेतला, ठाकरेंचा भाजपला पहिला धक्का
बाहेरचा माणूस नको, अशा घोषणा देत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय दणाणून सोडलं. रमेश नाडर बऱ्याच कालावधीपासून पक्षाचं काम करत आहे. प्रभागात त्यांची चांगली ताकद आहे. मग तरीही त्यांना उमेदवारी का दिली नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. नाडर यांना डावलून राजा यांना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.
पक्षानं उमेदवारीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी भाजपचं दादर येथील कार्यालय गाठून घोषणा दिल्या. मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेल्या अमित साटम यांच्या केबिनसमोर त्यांनी ठिय्या दिला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना शात करण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग झाला नाही.
राज ठाकरेंचे किल्लेदार, ठाकरे बंधूंचे शिलेदार; तिकीट फिक्स होताच मनसे, उद्धवसेनेत नाराजीचा स्फोट
काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या रवी राजा यांनी गेल्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. रवी राजा १९९२ पासून ते मुंबई महापालिकेवर निवडून जात आहेत. ते पाच टर्मचे नगरसेवक आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे.
