• Mon. Mar 9th, 2026

    Nagpur Elections: भाजपची ‘गुप्त फॉर्म रणनीती’, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची गुप्त उमेदवारी रणनीती, नव्या चेहऱ्यांना संधी

    Nagpur Elections: भाजपची ‘गुप्त फॉर्म रणनीती’, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची गुप्त उमेदवारी रणनीती, नव्या चेहऱ्यांना संधी

    Nagpur Municipal Corporation Elections: नागपुरात सध्या महानगरपालिका निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचा गड असलेल्या नागपुरात यंदा भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची गुप्त उमेदवारी रणनीती अवलंबली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज फॉर्म वाटप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बंडखोरी आणि पक्षांतर्गत असंतोष टाळण्यासाठी भाजपने अवलंबलेली ही ‘गुप्त रणनीती’ सध्या नागपुरात चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधी अनेक इच्छुक उमेदवारांना अंधारात ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.

    सोमवारी (29 डिसेंबर) भाजपकडून अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जांचे फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. मात्र, उमेदवारांची अधिकृत घोषणा न करता, काही निवडक उमेदवारांना अत्यंत गोपनीय पद्धतीने तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक प्रभागात एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांना तयारीत राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे शेवटपर्यंत कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार, याबाबत संभ्रम कायम होता.
    Maharashtra TimesNagpur Elections: फडणवीस-गडकरींच्या ‘होमटाऊन’मध्ये चौथ्या विजयासाठी भाजप सज्ज; तर पुनरुज्जीवनाच्या आशेने काँग्रेस मैदानात
    भाजपच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ‘ए’ आणि ‘बी’ हे दोन्ही फॉर्म आवश्यक असतात. सध्या अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांना केवळ ‘ए’ फॉर्म देण्यात आला आहे. तर, मंगळवारी (30 डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, ज्यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे, त्यांनाच शेवटच्या क्षणी ‘बी’ फॉर्म देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

    हे ‘बी’ फॉर्मही अत्यंत गुप्तपणे देऊन, तत्काळ नामांकन अर्ज दाखल करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या जाणार आहेत. सोमवारी जवळपास 50 च्या वर उमेदवारांना ‘बी’ फॉर्म चे वाटप करण्यात आले आहे.

    भाजपकडून तरुण चेहऱ्यांना संधी

    भारतीय जनता पक्षाने अवघ्या 45 वर्षीय नितीन नबीन यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून पक्षात मोठा खांदेबदल केला आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्ष तरुणांना संधी देणार असून दिग्गज माजी नगरसेवकांना नारळ देणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

    महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याकरिता आता केवळ 48 तास शिल्लक असून अद्यापही भाजपने अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी यादी अगदी वेळेवरच येणार असल्याचे समजते. आज निवडणुकींसदर्भात झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारीवर खल झाला. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मुद्दा चर्चेला आल्याचे कळते. यावेळी अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावांवरही खल झाला. त्यात यंदा दिग्गजांना नारळ देण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच अद्याप उमेदवारांची यादी जाहीर न झाल्याने इच्छूकांमध्ये विशेषत: दिग्गजांमधील अस्वस्थता वाढली असून प्रत्येकच जण आपआपल्या स्तरावर फिल्डिंग लावत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा