मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्र्याकडे राजीनामा सोपवला आहे.
“माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे”, अशी माहिती अजित पवारांनी ट्विट करत दिली आहे.
“सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कोकाटे यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नाशिकमधील एका हायप्रोफाईल परिसरात खोटे कागदपत्रे सादर करुन अल्प उत्पन्न गटातील सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे. याच प्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयाने कोकाटे यांना त्यांच्या भावासह चौघांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंडाची शिक्षा दिली होती. या निर्णयाला कोकाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं. पण सत्र न्यायालयाने देखील प्रथमवर्ग न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली आणि 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली. यानंतर कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने लगेच सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
या सर्व घडामोडींनंतर माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचा राजीनामा आता स्वीकारला देखील गेला आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या अडचणी अद्याप कमी झालेल्या नाहीत. कारण नाशिक पोलीस आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. कोकाटे सध्या आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस कोकाटेंना अटक करतात की दुसरी काही प्रक्रिया पार पडते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
