पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षाकडून आज इच्छुकांना अर्ज वितरीत करण्यात आले. विशेष म्हणजे आत तब्बल 409 अर्जांचं वितरण करण्यात आल्याची माहिती आहे.
इतर सर्व पक्षांनी अर्ज वितरणाला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या अर्ज वितरणाला सुरुवात झाली नव्हती. दोन दिवस झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकांनंतर शुक्रवारी आणि शनिवारी अर्ज वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, नरेंद्र तांबोळी आणि धनंजय दळवी यांनी इच्छुकांना अर्जांचे वितरण केले. रविवारपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
“केवळ तीन तासात आमच्याकडे ४०९ अर्ज आले. अर्जांसाठी रांग लागली होती. पुढील आठवड्यात मुलाखतींना सुरुवात होईल. शिवसेनेसोबत रविवारी दुपारी पुण्यातील शिवसेना भवनात अनौपचारिक चहापान होईल. यावेळी दोन्ही पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील”, अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी दिली.
विधानसभेत IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी, मंत्री Uday Samant म्हणाले, ’20 दिवसांत…’
स्थायी समितीच्या बैठकीत दोनशेहून अधिक प्रस्ताव मंजूर
दुसरीकडे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी कोट्यवधी रुपये खर्चाचे सुमारे दोनशेहून अधिक प्रस्ताव मान्य करण्यात आले. आचारसंहितेपूर्वी प्रशासकराज मधील ही शेवटची स्थायी समिती बैठक ठरणार असल्याने या बैठकीत प्रस्ताव मांडून मान्य करून घेण्यासाठी पालिकेत दिवसभर प्रचंड धावपळ सुरू होती. उशिरापर्यंत चाललेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कार्यपत्रिकेवरील सुमारे ९० व आयत्या वेळी आलेल्या आणखी १०० हून अधिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, साडेतीन वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगूल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात मार्गी लागलेल्या हजार कोटी रुपयांच्या विकासकामाांचे उद्घाटन करून घेण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. त्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष विशेष आग्रही असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी (१५ डिसेंबर) हजार ते बाराशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.
