उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पॅकेजच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर घणाघात केला.
“महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीत सुरु आहे. अधिवेशन हे आता अर्ध्यावर आलेलं आहे. उद्या संपणार की रविवारी संपणार? ते आज किंवा उद्या ठरेल. नागपूरमध्ये साधारणत: विधीमंडळाचं अधिवेशन हे विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी घेतलं जातं. सोमवारपासून हे अधिवेशन सुरु झालं. आजपर्यंत या अधिवेशनात विदर्भासाठी काय दिलं गेलं? असा प्रश्न उपस्थित केला गेला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हे वर्ष फार विचित्र गेलं. महाराष्ट्रावर कधी नव्हे ती एवढी आपत्ती अतिवृष्टीच्या रुपाने कोसळली. मी स्वत: मराठवाड्यात फिरलो. शेतकऱ्यांची घरं-दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं, विशेष म्हणजे पीकं सडून गेली तर अनेक ठिकाणी शेत जमीनच वाहून गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॅकेज असं गोंडस शब्द देवून एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं? की पुढे त्या पॅकेजचं देखील ठिबक सिंचन झालंय? ते कळायला मार्ग नाही”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘कोण होतास तू, काय झालास तू? मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं सुरु करावं’, Uddhav Thackeray यांचा खोचक सल्ला
“एक पद्धत आहे, आधी अर्थसंकल्प येतो, मग मागण्या, पुरवण्या मागण्या, मग त्यामध्ये आणखी मागण्या, 75 हजार कोटींच्या मागण्या, कुठून आणणार? कुणाला देणार? राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. पण मला एक मुद्दा अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की, महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हे राज्य सरकार घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं. आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे की, हा प्रस्ताव नेमका काय गेला आहे, किती रकमेचा गेला आहे, त्यातून कुणाला मदत होणार आहे?”, असा सवाल ठाकरेंनी केला.
“राज्य सरकारला आपण भाग पाडलं पाहिजे की, राज्याच्या मदतीसाठी आपण प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावर ठेवला पाहिजे. राज्यातील जनतेचा आणि शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की, मायबाप केंद्र सरकार आमच्यावर दया दाखवणार आहे की नाही? ती दया दाखवण्याच्याआधी राज्य सरकार नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे? मदतीची थट्टा झालेली आहे. एक रुपयाचा पीक विमा आलेला आहे. असे चेक आलेले आहेत. अशा कंपन्यांवर सरकार कारवाई करणार आहे का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘Amit Shah, तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री’, उद्धव ठाकरेंनी थेट फोटो दाखवला
“प्रश्न विचारले जातात, पण नुसती वेळ मारुन नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अधिवेशनात या प्रकरणात काय कारवाई होणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
