Nanded-Mumbai Vande Bharat: जालना येथे वंदे भारत एक्सप्रेसला म्हशीची धडक बसल्याने रेल्वे तब्बल ४० मिनिटे थांबली. या अपघातात रेल्वेच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. यापूर्वीही याच ट्रेनला बैलाची धडक बसली होती, ज्यामुळे जनावरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता ही दुर्घटना जालना स्टेशनजवळ घडली. धडकेचा जोर इतका होता की वंदे भारतच्या नोज हेडला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपात्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवण्यात आली आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ती जवळपास 40 मिनिटे ट्रॅकवरच उभी राहिली. अचानक थांबलेल्या प्रवाशांमध्ये मनस्ताप, गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, CNG टँक फुटला अन् कारला आग; पाच जणांचा कोळसा, पोलिसाचं अख्खं कुटुंब संपलं
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली. विशेष म्हणजे, हाच मार्ग पूर्वीही प्राण्यांच्या धडकेमुळे हादरला आहे. 2024 मध्ये लासूर स्थानकाजवळ वंदे भारतने एका बैलाला धडक दिली होती. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे प्राणी सुरक्षेबद्दल आणि ट्रॅकवरील नियंत्रणव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्राणी ट्रॅकवर कसे येतात? सुरक्षा कुंपण पुरेसे आहे का? जीआरपी–आरपीएफची गस्त प्रभावी आहे का? अशा प्रश्नांनी प्रवासी, स्थानिक आणि अधिकाऱ्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.
जनावरांच्या जीविताला धोका, रेल्वेचे नुकसान आणि प्रवाशांचा वेळ व सुरक्षितता, या तिहेरी संकटामुळे जालनामार्गे धावणाऱ्या वंदे भारतच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
धनुभाऊंना भर सभेत आली आरोपी वाल्मिक कराडची आठवण, मनोज जरांगेंचा संताप; काय म्हणाले?
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. वारंवार प्राणी रेल्वे ट्रॅकवर येण्यामागे रेल्वे प्रशासनाची निष्काळजीपणा, तुटकी कुंपणं आणि अपुरी सुरक्षा याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रवाशांचा जीव, गाडीची सुरक्षितता आणि लाखो रुपयांचे नुकसान, या तिन्हींची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी आता तरी ट्रॅकजवळील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ठोस पावलं उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
