• Wed. Mar 11th, 2026

    Pune News : संस्थेची गाडी कार्यालयासमोर लागली, सहकाऱ्यांच्या हातात उमेदवारी अर्ज, तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?

    Pune News : संस्थेची गाडी कार्यालयासमोर लागली, सहकाऱ्यांच्या हातात उमेदवारी अर्ज, तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?

    Giriraj Sawant BJP Candidacy : पुणे महानगरपालिकेची निवडणूकची लवकरच घोषणा होणार आहे. तत्पूर्वी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आमच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

    गिरीराज सावंत भाजप उमेदवारी अर्ज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे : पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज मागितले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जवळपास 2200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. यामध्ये अनेक विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सुद्धा भाजपचा अर्ज भरल्याची माहिती आहे. यामध्ये एक धक्कादायक नाव समोर आलं आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी देखील भाजपच्या इच्छुकांच्या यादीमध्ये आपला अर्ज दाखल केल्याची माहिती आमच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

    आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालय बाहेर तानाजी सावंत यांच्या जे.एस.पी.एम संस्थेची एक कार अचानक आली आणि त्यामध्ये सावंत यांच्या संस्थेतीलच काही कर्मचारी होते आणि त्यांच्या हातात होता तो तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज. काही वेळातच या कर्मचाऱ्यांनी गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या कार्यालयात दाखल केला आणि ते तिथून निघून गेले.

    Maharashtra TimesPune News : शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा ते अजित पवारांचे माजी नगरसेवक; भाजपचा उमेदवारी अर्ज घ्यायला इच्छुकांची गर्दी

    गिरीराज सावंत काय म्हणाले?

    याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी गिरीराज सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘शिवसेना हा आमचा पक्ष आहे. आमच्या घरात आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्विकारण्याचा किंवा घेण्याचा संबंध येत नसल्याचं’ म्हटलं आहे. दरम्यान, जरी गिरीराज सावंत यांनी या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं असलं तरी खात्रीलायक सूत्रांनुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधून गिरीराज सावंत यांनी अर्ज भरला आहे. आता गिरीराज सावंत यांनी खरंच भाजकडून अर्ज भरला आहे की नाही? हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे.

    Maharashtra TimesPune Kasba Ganpati : पुण्यातून मोठी बातमी; कसबा मंदिर 15 डिसेंबरपासून बंद, कारण…; इतिहासात अशी प्रक्रिया पहिल्यांदाच होणार

    भाजपची डोकेदुखी वाढली

    दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपने संपूर्ण 165 जागांची तयारी केली असून सर्व प्रभागातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. या दोन दिवसांच्या मुदतीमध्ये तब्बल 2200 अर्ज इच्छुक घेऊन गेले आहेत. प्रभागवार विचार केला तर प्रत्येक प्रभागामध्ये 20 हून अधिक जण भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आधीच भाजपमध्ये इच्छुकांची कमी नसताना दुसऱ्या पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेल्यानंतर भाजपच्या निष्ठवंतांची डोकेदुखी मात्र वाढली आहे हे नक्की.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा