• Fri. Mar 6th, 2026
    महायुतीतच प्रचारलढाई! नगर परिषद निवडणुकीत संघर्ष तीव्र, कोकणात शिवसेना- भाजप आमनेसामने

    Maharashtra Politics: ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध शहरांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांमध्येच लढत होत आहे.

    shinde vs fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    टीम मटा/ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच प्रचाराची खरी लढत असल्याचे चित्र दिसले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांच्या बड्या नेत्यांनी मुंबई महानगर प्रदेशासह कोकणात प्रचारसभा घेत बहुतांश ठिकाणी परस्परांना लक्ष्य केले. दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांमधील संघर्षाचा आपल्याला लाभ होईल, या फाजील आत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारात स्वारस्य दाखवले नसल्याचे दिसते.

    ठाण्यातील अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तिथे शिवसेना (उबाठा)-मनसे, काँग्रेसकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत. परंतु, येथील नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या भागांत शिवसेना आणि भाजपकडून बड्या नेत्यांच्या प्रचारसभा घेण्यात आल्या असल्या तरी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्थानिक नेत्यांसाठी कोणत्याही वरिष्ठ नेत्याने हजेरी लावलेली नाही. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांची एकमेव सभा वगळता या भागांत पक्षाच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.
    Maharashtra TimesEknath Shinde: अन्याय सहन करणार नाही! कार्यकर्त्यांवरील तक्रारींवरुन एकनाथ शिंदेंचा पोलिसांना इशारा
    पालघरमधील जव्हार, पालघर, डहाणू या नगर परिषदांमध्येही भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. ‘अहंकारी रावणाची लंका जळाली होती’, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी डहाणूमध्ये भाजपवर केली होती. त्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत कोणावरही टीका करणार नसल्याचे सांगत आपण लंकेत नव्हे, तर भारतात राहतो, असे प्रत्युत्तर दिले होते. या शहरांमध्ये शिवसेना, भाजपकडून प्रचाराचा झंझावात सुरू असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र संथगतीने सुरू आहे. जव्हार नगर परिषदेमध्ये शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) पक्षाचे उमेदवार असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांची वानवा जाणवली.

    सेना-राष्ट्रवादीत संघर्ष
    रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये प्रचारात संघर्ष दिसून आला. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे वर्चस्व असलेल्या या भागात त्यांच्याविरोधात शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यासह स्थानिक आमदार उभे ठाकले आहेत. इथे राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत.
    Maharashtra TimesNashik Politics: रात्र थोडी, सोंगे फार! उमेदवारांकडून नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग
    कोकणातही धुमशान
    रत्नागिरीमध्ये महायुती एकत्र असली तरी सिंधुदुर्गातील राणे बंधूंच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या भागांत विशेष लक्ष दिले असून, प्रचारदौरे केले आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी विरोधात, असा भाजप-शिवसेनेचा प्रचार सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्याकडून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असला तरी या दोन नेत्यांमधील वादामुळे प्रचाराला प्रभावी दिशा मिळाली नसल्याचे दिसते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा