Mumbai News: मुंबईत फसवणुकीचे प्रकार वाढले असून वांद्रे, कुर्ला आणि वरळी येथे धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणीच्या वडिलांनी मुंबईतील वांद्रे-माहीम परिसरात घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. परवेझ नावाच्या तरुणाने आईच्या नावावर घर असल्याचे सांगून चार लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून घेतले. मात्र, घर देण्यास उशीर झाला. चौकशी केली असता, परवेझ आणि त्याच्या आईने अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याचे समोर आलं आहे.
दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एका शिलाईकाम करणाऱ्याने चार लाखांचे हेवी डिपॉझिट देऊन खोली भाड्याने घेतली. मुदत संपल्यावर पैसे परत मागितले असता, घर मालकिणीने टाळाटाळ केली आणि उलट धमक्या दिल्या. वरळीत एका मालकाने 12 व्या मजल्यावरील खोली 11 महिन्यांच्या आगाऊ भाड्यावर दिली होती. मुदत संपण्यापूर्वी मालक चौकशीला पोहोचला असता, भाडेकरूने मालकाच्या नकळत तीच खोली दुसऱ्याला 15 लाख रुपये हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिल्याचे उघड झाल आहे.
‘हेवी डिपॉझिट’ म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर, घरमालकाला मोठी अनामत रक्कम देणे आणि त्या बदल्यात मासिक भाडे कमी किंवा अजिबात न भरणे. करार संपल्यावर किंवा घर सोडताना ही अनामत रक्कम भाडेकरूला परत मिळते. यामुळे घरमालकाला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते, ज्यावर तो व्याज मिळवू शकतो. तर भाडेकरूला दरमहा भाडे देण्याची गरज नसते व शेवटी त्याला संपूर्ण रक्कम परत मिळते.
दरम्यान, हे गैरप्रकार रोखण्यासाठी घरमालकांसह भाड्यान घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
