Pune Police: चाकणमध्ये एका भावाने आपल्या बहिणीच्या प्रियकराला लग्न करण्यापासून रोखण्यासाठी बेदम मारहाण असून त्याने आपल्या बहिणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. या घटनेनंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी अद्याप मोकाट आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मरकड व शुभम अवताडेची बहीण यांच्यात प्रेमसंबंध होते आणि ते लग्न करणार होते. 27 नोव्हेंबरच्या रात्री प्रशांत आणि त्याची प्रेयसी चाकण-तळेगाव चौकात थांबले होते. त्याचवेळी इर्टिगा गाडीतून शुभम अवताडे, साहिल तिजोरे आणि सुधीर केदारी तिथे आले. त्यांनी प्रशांतला ‘तुम्ही लग्न करायचं नाही’ असं म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच नंतर शुभमने आपल्या बहिणीला जबरदस्तीने गाडीत ढकलले. इतर दोघांनी प्रशांतवर दगडांनी हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या हल्ल्यानंतर शुभम आपल्या बहिणीसह गाडीतून शिक्रापूरच्या दिशेने पळून गेला. या गंभीर घटनेनंतर चाकण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, आरोपी अद्याप मोकाट आहेत.
चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ‘सात वर्षांच्या आतील शिक्षेचा गुन्हा असल्याने अटक करता येत नाही’ असे सांगत या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन समज देणे आवश्यक असताना, केवळ कायदेशीर कारवाईच्या अभावामुळे या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष होत आहे.
