महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत महिला बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आसनपोई–बिरवाडी येथील जहरीना अली महमद खान या 22 नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत.
जहरीना खान या 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता “भाजी आणायला जाते” असे सांगून घरातून बाहेर पडल्या. नेहमीप्रमाणे काही वेळात त्या परत येतील अशी अपेक्षा असताना त्या दिवसापासून त्या परतल्याच नाहीत. चार दिवस उलटूनही त्यांच्या हालचालींचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबियांची चिंता प्रचंड वाढली आहे. शेवटी जहरीना यांच्या पतीने, अली महंमद जान महंमद खान (रा. गणेश नगर, आसनपोई), यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
Dhananjay Munde: ‘लोकांना देवाच्या आधी मी…’; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची चर्चा, म्हणाले, ‘परळीचं नाव…’
पोलिसांनी जहरीना यांचे तपशीलवार वर्णन जाहीर केले आहे. चेहरा उभट, अंगाने मध्यम, उंची अंदाजे पाच फूट, गळ्यात मन्याचे मंगळसूत्र, दोन्ही हातांमध्ये गुलाबी रंगाच्या बांगड्या, पायात चंदेरी रंगाचे पैंजण, तसेच अंगावर गुलाबी साडी आणि त्याला जोडणारा ब्लाऊज, तर पायात लाल रंगाच्या चप्पला. या सर्व तपशीलांवरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आसपासच्या गावांमध्येही शोधमोहीम सुरू आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चनप्पा अंबरगे घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मागील काही दिवसांत महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी अचानक वाढ झाली असल्याने पोलिसांनी सावधगिरीचे उपाय वाढवले आहेत. महाडातील नागरिकही या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे घाबरून गेले असून विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जहरीना खान यांच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाल्यास ती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यास तात्काळ कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कुटुंबीय मात्र त्यांच्या सुरक्षित परतीची आशा धरून आहेत.
