Pune Police: पुण्यातील एका महिलेला पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये बहिणीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग परत मिळवून दिली. महिलेने गडबडीत रिक्षा बदलताना वारजे येथे बॅग विसरली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि ‘नाकाबंदी’ ॲपच्या मदतीने पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन बॅग सुरक्षित परत मिळवली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण 11 वाजता एक महिला आपल्या लहान मुलासह वारजे पोलीस ठाण्यात धावत आली. तिने पोलिसांना सांगितलं की, “बहिणीचा संसार वाचवण्यास गेले; पण तिच्याकडून आणलेले दागिने माझ्याकडून हरवले आहेत. आता मी तिला काय उत्तर देऊ?” उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला धीर दिला.
ही महिला सुरतहून आपल्या बहिणीकडे येत होती. त्या वारजेऐवजी चुकून नवले पूल येथे उतरल्या. तिथून त्यांनी दुसरी रिक्षा पकडून वारजे गाठले. परंतु, घाईगडबडीत रिक्षातून उतरताना त्यांची बॅग मागेच राहिली. या बॅगेत सुमारे अडीच ते पावणेतीन तोळे सोन्याचे दागिने होते. घरी जाताना बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण ते दागिने बहिणीचे होते आणि त्यांना रिक्षाचा क्रमांकही आठवत नव्हता.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगंडे आणि प्रकाश धेंडे यांनी तातडीने बीट मार्शल शिवाजी भोसले आणि माधव औताडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अंमलदार नंदकुमार चव्हाण, शिवाजी भोसले आणि माधव औताडे यांनी वारजे सर्व्हिस रस्त्यापासून नवले पुलापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. अनेक तास फुटेज तपासल्यानंतर त्यांना रिक्षाचा क्रमांक मिळाला. यानंतर ‘नाकाबंदी’ ॲपचा वापर करून रिक्षाचालकाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक शोधण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी रिक्षाचालकाला नवले पूल येथे बोलावलं. त्यावेळी रिक्षाच्या मागील सीटवर ठेवलेली बॅग सुरक्षित अवस्थेत पोलिसांना मिळाली आणि सदर महिलेने सुटकेचा निश्वास सोडला.
