• Tue. Mar 10th, 2026
    Dhananjay Munde: ‘लोकांना देवाच्या आधी मी…’; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची चर्चा, म्हणाले, ‘परळीचं नाव…’

    धनंजय मुंडे यांनी परळीत केलेल्या विकासकामांची माहिती देताना केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलचं व्हायरल झालं आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे भाष्य केलं आहे, ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका विधानामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी परळीतील लोकांना अडचणीत असताना देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतात, असे म्हटले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. परळीतील विकासाच्या कामांचा उल्लेख करत लोकांचा विश्वास संपादन करण्यावर त्यांनी भर दिला.

    धनंजय मुंडे यांनी परळीत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले की, “मी परळीपासून फाटक तुटू देत नसतो.” रेल्वेसाठी पैसे मागितले असून रेल्वेची जागा हस्तांतरित होणार आहे. एका महिन्याच्या आत घरकुल मंजूर करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. म्हाडामार्फत सर्वेक्षण करून १७०० घरकुले बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण झाले असून ६५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल विद्यावर्धिनीची करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    “लोकांना देवाच्या आधी मी आठवतो,” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेत मिळालेल्या प्रचंड मतांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “परळी विधानसभेत मला एवढी मतं दिली की मशीनला मोजायला कंटाळा आला. तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम दिलेलं आहे, ते विसरू शकत नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “एखाद्याला व्यक्तीला अडचण आली की देवांच्या आधी धनंजय मुंडेचा नंबर आठवतो. तो मला फोन करतो आणि त्याची अडचण सांगतो. मी नशीबवान आहे. माझं संबंध जीवन आपल्या सेवेत जाणार आहे.”

    यावेळी त्यांनी परळी शहराचे नाव देशात उंच करण्याचा मानस व्यक्त केला. निवडणुकीत सुरुवातीलाच विजय दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. मागील एका वर्षात निवडणुकीनंतर मंत्री बनलो आणि सोडले, याचे दुःख किंवा खेद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परळीला बदनाम करणाऱ्यांना मतांमधून दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. “माझ्या जागेवर दुसरा असता तर टिकला नसता,” असे सांगत त्यांनी लोकांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे परळीचे नाव देशात उंच करेल, असे ते म्हणाले. परळी शहरातील रस्ते चांगले झाले आहेत. बीडमध्ये जाती-पातीचे किंवा धर्माचे राजकारण चालत नाही, असे सांगत त्यांनी चांगले काम करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. परळी शहराचे नाव पुन्हा देशात बुलंद करेल, लोक म्हणतील पुन्हा देशात नाव उंच केले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा