• Thu. Jun 18th, 2026
    सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका, कारण…; असीम सरोदेंचा गंभीर आरोप

    Suresh Dhas News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप केला जात असताना आता असीम सरोदे यांनी नवा दावा केला आहे.

    राम खाडेंची केस घेतलेल्या असीम सरोदेंचा गंभीर आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. राम खाडे यांच्यावरील हा हल्ला करण्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी केला आहे. मनोज चौधरी यांच्यानंतर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

    राम खाडे यांच्याप्रमाणे माझ्याशी जीवितला धोका असल्याचं खाडे यांनी स्वतः मला सांगितलं होतं, असं पुण्यात बोलताना असीम सरोदे म्हणाले आहेत. तर, राम खाडे याच्याशी माझं 15 दिवसांपूर्वी बोलण झालं होतं, त्यांना सांगितलं होतं जीवाला जपून काम कर. ते म्हणाले होते माझ्यासोबत लोक असतात. मी जपून काम करत आहे. तरी देखील राम खाडे यांच्यावर हल्ला झाला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याची विशेष चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.

    दरम्यान, सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास 200 हेक्टर जमिनी हडपून तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राम खाडे यांनी केला होता. या संदर्भातील केस असीम सरोदे यांच्याकडे होती. इनामी जमिनी भोगवटा वर्ग – 2 च्या आष्टी येथील जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी वेळोवेळी केलेला आहे. सेवा कार्यासाठीच्या वक्फ, मंदिर ट्रस्ट यांच्या इनामी जमिनीवर सुरुवातीला दुसऱ्यांची नावे चढवायची. त्यानंतर आपल्या नावावर वाळवायची हे सुरेश धस यांचा षडयंत्र असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.

    दुसरीकडे, “राम खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करत आहेत. मध्यंतरी त्यांनी आष्टी तालुक्यातील विविध देवस्थान इनाम जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या व‌ त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होता. म्हणून मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. तसेच न्यायालयानेही त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली याची माहिती नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे,” असं सरोदे म्हणाले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा