Pune News : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडीसाठी फारसे उत्सुक नाहीत. भाजपला शह देण्यासाठी ही आघाडी अपेक्षित असली तरी, यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता आहे.
प्रशांत जगताप यांनी या चर्चेला दुजोरा दिला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. काँग्रेसचे प्रभारी सतेज पाटील आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्याशी बोलणे झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महाविकास आघाडी महापालिकेत निवडणूक लढवेल, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
Central Railway: फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल; 7 महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड वसूल
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना बंडखोरी करण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढली आहे. भाजप त्यांना सोबत घेण्यास तयार नाही आणि महाविकास आघाडीतही त्यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक स्थानिक नेते निवडणूक लढवण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे ही आघाडी कोणाच्या फायद्याची ठरेल, यावरच ती होणे अवलंबून असेल.
