• Tue. Sep 22nd, 2026

माडग्याळ मेंढीला स्वतंत्र राष्ट्रीय प्रजातीच्या मान्यतेबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचा धनगर समाजाकडून सत्कार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

मुंबई, दि. २२ : माडग्याळ मेंढीला अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा मंत्रालयात सत्कार केला. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र आणि अधिकृत प्रजाती म्हणून मिळालेल्या मान्यतेमुळे तिचे संवर्धन, जतन आणि आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरोने नोंदणी दिली आहे. या निर्णयाबद्दल जत तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्री पंकजा मुंडे यांचा घोंगळी, काठी व माडग्याळ मेंढीची प्रतिकृती देऊन सत्कार केला.

माडग्याळ मेंढीला मिळालेली मान्यता ही जत परिसरातील पशुपालकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी नमूद केले.

धनगर आणि रामोशी समाजातील मेंढपाळ तसेच शेतकरी माडग्याळ मेंढ्यांचे पालन करतात. विषम हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, उत्तम रोगप्रतिकारशक्ती, जलद वजनवाढ, कोकरांच्या जगण्याचे अधिक प्रमाण, चांगली मातृत्व प्रवृत्ती आणि मांस उत्पादनासाठी उपयुक्तता या वैशिष्ट्यांमुळे ही मेंढी लोकप्रिय होत आहे.

सांगली जिल्ह्यातील माडग्याळ आणि सनमाडी गावांतील स्थानिक मेंढीपालकांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी निवड पैदास पद्धतीने या मेंढीची पैदास केली. माडग्याळ ही महाराष्ट्रातील मोठ्या आकाराची आणि मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय मेंढी आहे. या मेंढ्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्यावर तपकिरी ठिपके आढळतात; काही मेंढ्या पूर्णपणे तपकिरी रंगाच्याही असतात.

०००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed