काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत काँग्रेसचं एकदिवसीय शिबिर पार पडलं आहे. या शिबिरात मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचं मुंबईत आज एकदिवशीय शिबिर पार पडलं. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचं होतं. या शिबिरनंतर रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
रमेश चेन्नीथला नेमकं काय म्हणाले?
“मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस मुंबईतील संपूर्ण 222 जागांवर निवडणूक लढेल. आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची स्वबळावर स्वतंत्र निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत युती करणार का? अशा प्रश्नावर मोठं उत्तर दिलं आहे. मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरुन नाही, असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या निवडणुकीतील ऱ्हासानंतरही काँग्रेस असा निर्णय घेत आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
“आम्ही मुंबईत सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आहोत. आम्ही मुंबईकरांचा त्रास रोज बघत आहोत. म्हणून एक अपेक्षा करत होतो की, मुंबईत सगळ्यांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पण काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा-व्यवस्था आपल्या हातात घेतली जाते, जी भाषा वापरली जाते ती आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरुन नाही. तुम्ही विचारताय की, X Y Z पक्षासोबत तुम्ही जाणार आहात का? आमची महाविकास आघाडीत नेहमी भूमिका राहिलेली आहे की, कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
“आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारमध्ये झालेला ऱ्हास पाहूनही त्यांना वाटत असेल की, अशा पद्धतीने जावं. तर त्यांना कुणी थांबवू शकत नाही. त्यांचे वरिष्ठच थांबवू शकतात. पक्षाचे प्रमुख जे निर्णय घेत आहेत त्यांना तो निर्णय योग्य वाटत आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. त्यांना लवकरच कळेल”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

