सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हॉटेल मालकाने हॉटेल मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकाराने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’च्या दणक्यानंतर अखेर मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 येथे हा प्रकार घडल्याचे उघड झाले. या हॉटेलमध्ये काम करीत असणाऱ्या मॅनेजरलाच हॉटेलचा मालक लखन माने याने सर्व कामगारांच्या देखत नग्न करून पाईपने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर हॉटेल मालक लखन माने याने फेसबुक वरून या मॅनेजरला सोबत घेत याचा खुलासाही केला होता. मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला मारहाण केल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले होते.
मात्र आज पोलिसांनी या प्रकरणी मारहाण झालेल्या फिर्यादींकडून फिर्याद घेत वस्तुस्थिती समोर आणली. त्यानुसार हॉटेल मालक लखन माने यांनी मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दमबाजी करत नग्न करून मारहाण तर केली, शिवाय त्याच्या खिशातले पैसेही काढून घेतल्याचे टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. ही घटना तीन महिन्यापूर्वीची असल्याचे मारहाण झालेला निवासी नखाते यांनी पोलिसांना सांगितले आहे. लखन माने याच्या दहशतीमुळे अजूनही पीडित कर्मचारी त्याच हॉटेलवर काम करीत असून पोलिसांना तसा जबाबही दिल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’च्या बातमीनंतर टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने हॉटेलवरून आरोपी लखन माने यास ताब्यात घेत तब्बल आठ वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दहशत माजवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान लखन माने या आरोपीने कामगारांवर दहशत बसवण्यासाठी केलेल्या या अमानवी मारहाणीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

