Nanded- Pune Vande Bharat: नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 10-12 तासांवरून 7 तासांवर येणार आहे.
सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे 550 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, वंदे भारत एक्सप्रेस मुळे हा वेळ जवळपास अर्धा म्हणजे केवळ 7 तासांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्च वाचणार आहे.
Pune News : पुणेकरांचा प्रवास आता अधिक सुखकर; लोणी काळभोर, सासवड मेट्रो पुरंदर विमानतळापर्यंत, 14 स्थानकांचा मार्ग
कुठे असणार थांबे?
नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर या एक्सप्रेसचे थांबे असतील. या मार्गावर शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीसाठी पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या मर्यादित रेल्वे सेवा असल्यामुळे प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो, जो वेळखाऊ आणि खर्चिक ठरतो. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. यामुळे केवळ प्रवासाचा त्रास कमी होणार नाही, तर रोजगार, शिक्षण आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
या सेमी हाय-स्पीड ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत –
- हाय-स्पीड Wi-Fi
- एअर कंडिशन्ड चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार
- आरामदायी रिक्लाइनिंग सीट्स
अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली - अधिक गती आणि कमी आवाजात प्रवास
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही : शरद पवार
तिकिट दर आणि वेळापत्रक
या मार्गासाठी एसी चेअर कारचे तिकीट दर 1500 ते 1900 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. आठवड्यातून पाच ते सहा वेळा ही एक्सप्रेस धावेल, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तथापि, तिकीट दर आणि अधिकृत वेळापत्रक लवकरच रेल्वे विभागाकडून जाहीर केले जाणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस तिच्या वेग, आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. आता ही सुविधा नांदेड–पुणे मार्गावर उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार आहेत.

