Crime News: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करण्यात आला. आरोपीने पीडितेला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
कृष्णा माणिकराव काळे (वय 25, राहणार शिवना) असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा याने अल्पवयीन मुलीला महाविद्यालयाच्या आवारातच गाठलं. बोलत असताना चारचाकी वाहनात बसण्यास सांगितलं. मुलीने नकार दिला असता ‘तुझ्या वडिलांचा बळी घेईन’ अशी धमकी देऊन तिला वाहनात बसवून फर्दापूरला नेले. तिथं असलेल्या एका लॉजमध्ये घेऊन जात पुन्हा जीव घेण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
मुलीने या सगळ्या प्रकारला विरोध केला तरी कृष्णा याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत पीडितेला पुन्हा तिथं आणून सोडलं. पीडिता महाविद्यालयातून संध्याकाळी घरी परतल्यावर तिने पालकांना सर्व हकिकत सांगितली. या घटनेमुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी पीडित मुलीला घेऊन तातडीने अजिंठा पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगत आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा पोलीस करत असून या घटनेनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

