• Wed. Sep 16th, 2026

NCP Politics : सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली असली, तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येते. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाला आलेली मरगळ घालविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली असली, तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ केले जाणार असल्याचे समजते. अजित पवार असताना ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा राष्ट्रवादीच्या सगळ्या जाहीर कार्यक्रमात दुमदुमत असे. मात्र आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांना जबाबदारी

राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार व त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांनीच खांद्यावर घेतली आहे. पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी द्यायला पाहिजे, अशी भूमिका आता पक्षात घेतली जाऊ लागली आहे. त्यातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाला आलेली मरगळ घालविण्याची जबाबदारी सोपविल्यानंतर पक्षात संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

Maharashtra TimesBihar Politics : जेडीयू पक्षाचे नाव दोन दशकांनी बदलण्याची चिन्हं, नितीश कुमार यांच्या नावाचाही समावेश होणार, फुटीच्या चर्चांना जोर

तटकरे-पटेलांबाबत संदिग्ध भूमिका

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे अद्याप त्या पदावर आहेत किंवा कसे याबाबत पक्षातून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल पटेल यांचे नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नोंदवलेले नाही. तसेच सुनील तटकरे यांच्याकडील प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीबाबतही पक्षात दोन मतप्रवाह स्पष्ट दिसू लागले आहेत.

आमदारांमध्ये अस्वस्थता

प्रशांत किशोर यांनी पक्षाला पुन्हा एकदा उभारी यावी, म्हणून विविध उपाय सुचवल्यानंतर त्याविषयीही पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याचा कार्यभार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतल्यानंतर ते खाते पुन्हा मिळावे याची पक्षनेतृत्वाची इच्छा असली, तरी तसे होण्याची काहीही चिन्हे नाहीत. परिणामी पक्षातील आमदारांना छोट्या-मोठ्या कामांसाठी मंत्रालयात खेटे घालावे लागत असल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Maharashtra TimesRishabh Sambyal : राष्ट्रपतींचे ADC झाल्याने अविवाहित राहावं लागलं, मेजर ऋषभ संब्यालने सांगितली अट, द्रौपदी मुर्मू म्हणजे साक्षात आईचं रुप

राज्यभर दौरे, महिलांचा सहभाग

या सगळ्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, आता प्रशांत किशोर व त्यांच्या टीमने दिलेल्या आराखड्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ ताकदीने करायचे, तसेच सुनेत्रा पवार यांचे महाराष्ट्रभर दौरे आयोजित करायचे. या दौऱ्यांपूर्वी त्यांच्या सभांना महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे लक्ष द्यायचे, अशी रणनीती ठरली असल्याचे बोलले जाते.