Mumbai Police News: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दुबईतून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. डी-गँगशी संबंधित सलीम डोळ्याचा साथीदार मोहम्मद सलीम शेख याला दुबईतून अटक करण्यात आली असून या कारवाईत 256 कोटींहून अधिक किमतीचा मेफेड्रोन जप्त करण्यात आला.
या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2025 मध्ये कुर्ला परिसरातून झाली. क्राईम ब्रँचच्या युनिट-7 ने परवीन बानो गुलाम शेख नावाच्या महिलेला 641 ग्रॅम मेफेड्रोन आणि 12.20 लाख रोख रकमेसह अटक केली होती. त्यानंतर परवीनने चौकशीत धक्कादायक माहिती दिली. तिने सांगितलं की, तिला हे ड्रग्ज मिरा रोड येथील साजिद शेख उर्फ डैब्ज याच्याकडून मिळाले. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी साजिदला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून सुमारे 6 कोटी किमतीचे 3 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. साजिदच्या चौकशीतून या नेटवर्कचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं असून मोहम्मद सलीम सुहैल शेख हा दुबईतून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क चालवत असल्याचे उघड झालं. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इरली गावातून या टोळीचा मेफेड्रोन पुरवठा होत होता. पोलिसांनी 28 मार्च रोजी सांगलीतील एका अवैध फॅक्टरीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल 122.5 किलो मेफेड्रोन, ड्रग्ज निर्मितीचे साहित्य आणि एक वाहन जप्त करण्यात आले. फॅक्टरीतून 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. या फॅक्टरीसाठी लागणारा कच्चा माल संयुक्त अरब अमिरातीमधील एका केमिकल कंपनीतून मागवला जात होता, असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम शेख हा दुबईत लपून बसला होता. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर दुबई पोलिसांच्या मदतीने मोहम्मद सलीम शेख याच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यात आलं आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे असून जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 256 कोटींहून अधिक आहे.

