Solapur Crime News : सोलापुरात एका कामगाराचा भयंकररित्या मृत्यू झाला आहे. तरुणावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याच्या जाण्याने दोन चिमुकल्यांचं पितृछत्र हरपलं असून भरदिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत तरुणाचं नाव लवकुश झंगी (वय 22, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. 105 मुरारजी पेठ, सोलापूर) असं आहे. या घटनेने इतर हॉटेल कामगारांनी हॉटेल मालकाबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे. दिवाळी सारख्या सनासुदीच्या काळात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
अंघोळ करताना लोखंडी अँगलला स्पर्श; विजेचा जोरदार धक्का –
गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील रसिक हॉटेलच्या टेरेसवर लवकुश आंघोळ करत होता. दिवाळी सण असल्याने लवकुश हा नवीन कपडे घालून बाहेर जाणार होता. पण अंघोळ करताना त्याचा हात लोखंडी अँगलला लागला आणि त्याला जोरदार विजेचा शॉक लागला. विजेच्या धक्क्याने हॉटेल कामगार जागेवरच बेशुद्ध झाला. त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
Kolhapur News : बाळूमामाच्या दर्शनावरून परतताना नियतीने घात केला, पेट्रोल संपलं आणि भयंकर घडलं…कोल्हापुरात हळहळ
लवकुश याच्यावर कुटुंबाची जबाबदारी –
लवकुश याच्या सोबत इतर नातेवाईक सोलापुरातील हॉटेलमध्ये काम करतात. नातेवाईकांनी माध्यमांसामोर बोलताना माहिती दिली. लवकुश याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्याला दोन लहान मुलं आहेत. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने तो दिवाळीलाही मूळ गावी गेला नव्हता.
पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्या हॉटेल कामगाराचा मृतदेह उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी तिथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

