• Wed. Aug 19th, 2026

Mumbai Bike Rider Riddhi Thakkar Death : स्वतःची बुलेट असतानाही रिद्धीने हट्टाने अपघातग्रस्त ‘अव्हेन्जर’ बाईक चालवली, असा दावा आयोजकांनी केला आहे. त्या बाईकचे ब्रेक सैल झाले होते, असेही आता आयोजकांतर्फे सांगण्यात येत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई/रांची : बस्तरकडे जाणाऱ्या महिला बाईकर्सच्या रॅलीत सहभागी झालेली मुंबईतील २४ वर्षीय रायडर रिद्धी ठक्कर हिचा १२ ऑगस्ट रोजी छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात ‘हिट अँड रन’ अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचा तपास करताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. स्वतःची बुलेट असतानाही तिने हट्टाने अपघातग्रस्त ‘अव्हेन्जर’ बाईक चालवली, असा दावा आयोजकांनी केला आहे. त्या बाईकचे ब्रेक सैल झाले होते, असे आयोजकांतर्फे सांगण्यात येत आहे.

आयोजकांवर बाईकर्स ग्रुपचे आरोप

या घटनेमुळे सोशल मीडियावर, विशेषतः बाईकर्स ग्रुप आणि रिद्धीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याचं कारण म्हणजे रिद्धी एक अत्यंत कुशल बाईक रायडर म्हणून ओळखली जात असे. अनेकांनी व्हिडिओ पोस्ट करुन आयोजकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तर काहींनी छत्तीसगड-स्थित ‘वुमन रायडर्स क्लब’ आणि रॅलीत सहभागी झालेल्या महिला रायडर्सनाही याबद्दल जाब विचारला होता.

यावर उत्तरादाखल रॅलीत सहभागी असलेल्या २२ महिला रायडर्सपैकी नंदिनी तित्रे आणि सिद्रा खान यांनी व्हिडिओ शेअर केला होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोघींनी सांगितले की, या अपघातामुळे त्यांनाही दुःख झाले आहे, परंतु त्यांना दोष देणे योग्य नाही.

रॅलीत दोन बाईक अपघात

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या रिपोर्टनुसार नंदिनी तित्रे म्हणाल्या, “या ग्रुपमध्ये नागपूर, पुणे, भोपाळ आणि छत्तीसगडमधील रायडर्स होत्या. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास आम्ही रायपूरहून कांकेरसाठी निघालो. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास, रस्त्यावर अचानक आलेल्या जनावरामुळे भोपाळमधील एका रायडरचा अपघात झाला. त्यानंतर नागपूरमधील ‘अव्हेन्जर’ बाईक चालवणाऱ्या एका रायडरची तिच्या बाईकशी धडक झाली. दोन्ही रायडर्सना बॅकअप व्हॅनमध्ये नेण्यात आले. पहाटे ५.२० च्या सुमारास आणखी एक अपघात झाला आणि आम्हाला त्याबद्दल ५.२६ वाजता फोन आला. आमच्या गटात १६ बाईक्स असल्याने आम्ही घाटावर थांबू शकत नव्हतो. आमच्या सर्व बाईक्स घाटाच्या शेवटी २० मिनिटे थांबल्या. आम्ही पुढे गेलो आणि सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या नाश्त्याच्या ठिकाणी थांबलो. दोन अपघात झाल्यानंतर आम्ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९.०७ च्या सुमारास, आमच्या एका रायडरकडून आम्हाला रिद्धीच्या मृत्यूची माहिती मिळाली.”

Maharashtra TimesNashik News : घराला कुलूप लावून डॉक्टर दाम्पत्य क्लिनिकला, परत येताच हृदयद्रावक दृश्य, सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत अंत

रिद्धी बुलेट चालवत नव्हती

नंदिनी तित्रे यांनी उल्लेख केलेला दुसरा अपघात हा रिद्धीचाच होता. त्यांनी उल्लेख केलेली ‘अव्हेन्जर’ बाईक त्यावेळी रिद्धी चालवत होती. रिद्धी स्वतःची ‘बुलेट’ बाईक का चालवत नव्हती, असा प्रश्न रिद्धीचे वडील दिव्येश यांनी उपस्थित केला होता. ही रॅली अमिता बैस आणि छाया सिंग यांनी त्यांच्या ‘वुमन रायडर्स क्लब’च्या माध्यमातून आयोजित केली होती. अमिता यांनी सांगितले की, ही त्यांची पहिलीच रॅली होती.

अव्हेंजर चालवताना अपघात

अपघात कसा झाला आणि रिद्धी ‘अव्हेन्जर’ बाईक का चालवत होती, याबद्दल माहिती देताना अमिता म्हणाल्या, “मी तिच्या मागे साधारण ५० फूट अंतरावर होते, कारण रॅलीमध्ये मी सर्वात शेवटी (टेल रायडर म्हणून) चालत होते. जिथे अपघात झाला, तिथे ‘C’ आकाराचे वळण होते आणि तो एक ‘ब्लाईंड स्पॉट’ होता. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने तिला चिरडले आणि चालक घटनास्थळावरुन पळून गेला. हे सर्व अवघ्या तीन ते चार सेकंदात घडले. मी रॅलीच्या लीड रायडरला कळवले; आम्ही त्वरित रुग्णवाहिका बोलावली आणि सात ते आठ मिनिटांच्या आत रिद्धीला रुग्णालयात नेले.”

Maharashtra TimesNashik Crime : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळा

अडवूनही ब्रेक लिव्हर सैल झालेली बाईक चालवली

अपघातापूर्वीच्या घटनाक्रमाबद्दल बोलताना अमिता म्हणाल्या, “पहिल्या अपघातानंतर ‘अव्हेंजर’ बाईकचा ब्रेक लिव्हर सैल झाला होता आणि रिद्धीला ती चालवायची होती. आम्ही तिला दोन-तीनदा सांगितले की आम्ही तिला तसे करु देणार नाही, ती चालवण्याची गरज नाही आणि आम्ही ती टो करुन नेऊ शकतो; पण तिने हट्ट धरला. छायाने बाईकचे हँडल पकडून तिला चालवण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही केला, तरीही तिने आग्रहच धरला. ती एक अनुभवी आणि कुशल रायडर होती आणि तिने मुंबईपासून इथपर्यंत बाईक चालवली होती; आमच्या रॅलीचा तो पहिलाच दिवस असल्याने आम्हाला तिला नाराज करायचे नव्हते. तिने ‘अव्हेंजर’ साधारण २० ते २५ किलोमीटर चालवली आणि त्यानंतर अपघात झाला. आणखी २० किलोमीटरनंतर आम्हाला ती बाईक सोडून दुसऱ्या रायडरकडे सोपवायची होती).”

रॅलीत सहभागी असलेल्या आणि नाव न सांगू इच्छिणाऱ्या काही महिला रायडर्सनी सांगितले की, रिद्धी एक ‘व्लॉगर’ होती आणि तिने हेल्मेटवर ‘गो-प्रो’ कॅमेरा लावला होता. बालोद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले, “आम्ही एका अज्ञात चालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच आम्ही आयोजकांचीही चौकशी करत आहोत.”

‘द इंडियन एक्सप्रेस’ने रिद्धीचे वडील दिव्येश यांच्याशीही संपर्क साधला असता ते म्हणाले, “अपघातासाठी कोण जबाबदार आहे हे आम्हाला माहित नाही. पण या दुःखातून आमचे कुटुंब अजूनही सावरलेले नाही.”

Maharashtra TimesAmravati Crime : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरण, वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांची साडेपाच वर्षांनी मुक्तता, सुप्रीम कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

सोशल मीडियात आयोजकांवर टीका

अमिता यांनी सांगितले की, अपघातानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागत आहे. त्या म्हणाल्या, “सोशल मीडियावर मला अनेक अस्वस्थ करणारे मेसेज आले आहेत. या घटनेसाठी आम्हाला जबाबदार धरले जात आहे. ‘वुमन रायडर्स क्लब’ अंतर्गत ही पहिलीच रॅली असली, तरी आम्ही यापूर्वी पाच बाईक रॅलींचे आयोजन केले आहे आणि आम्ही नियमांबाबत अत्यंत काटेकोर असतो.”

अपघाताच्या रात्री एका अज्ञात चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे) आणि २८१ (सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रक चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा