Maval News: मावळच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजप नेते बाळा भेगडे एका मंचावर एकत्र आले. तळेगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी दोघांनी विकासासाठी सहकार्याची तयारी दर्शवली. या ऐतिहासिक भेटीमुळे राजकीय वर्तुळात ‘मामा-भाचा’ पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले आहे.
‘मावळच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकारण वेगळं असलं, तरी विकासाच्या कामात आपण सर्व एक टीम म्हणून काम करू शकतो. बाळा भेगडे यांनी फक्त सहकार्याची टाळी दिली, तर मावळचा विकास अधिक वेगाने साधता येईल. मी मावळच्या विकासासाठी राजकारण विसरून हात पुढे केला आहे. भेगडे साहेबांनी तो हात धरला, तर नक्कीच आपला तालुका राज्यात आदर्श ठरेल,’ असं सुनील शेळके यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
शेळके यांच्या या वक्तव्याला भेगडे यांनी सुद्धा त्याच स्टाईलने प्रतिसाद दिला आहे. ‘मावळ तालुक्याच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. राजकारणात मतभेद असतात, पण विकासासाठी एकत्र येणं हाच खरा उद्देश असावा. निवडणुका शांततेत आणि सलोख्याने पार पडल्या, तर महिलांना आणि कार्यकर्त्यांना नवे अनुभव देण्यासाठी आपण प्रयत्न करू,’ असं बाळा भेगडे म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी महायुतीच्या भूमिकेविरुद्ध जाऊन सुनील शेळके यांच्याविरोधात प्रचार केला होता. अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या प्रचारात बाळा भेगडे हे सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यामुळे दोघांमधील दुरावा अधिक वाढला होता. मात्र, आता दोघांच्या संवादातून तो तणाव ओसरताना दिसत असून मामा-भाचे एकत्र येणार का? या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या भेटीनंतर मावळच्या राजकारणात नवा सूर उमटल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘मामा-भाचा’ ही जोडी पुन्हा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट येण्याचे चिन्हे दिसत आहेत.

