• Mon. Mar 16th, 2026

    ऐन दिवाळीत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; शेळीला वाचवण्यासाठी गेले अन्…, पुण्यातील दु:खद घटना

    ऐन दिवाळीत पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; शेळीला वाचवण्यासाठी गेले अन्…, पुण्यातील दु:खद घटना

    ऐन दिवाळी सणात दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समोर येत आहे. शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती पत्नीच्या मृत्यूमुळे कुंटुंबावर शोककळा परसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे : ऐन दिवाळी सणात शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेला शॉक बसला, तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीलाही शॉक लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील नांदगाव येथे घडली. दि.22 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत राजाराम बापूराव खळदकर आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर (रा.नानगाव, ता.दौंड जि.पुणे) या दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील नानगाव येथे भीमा नदीच्या तिरावर मनीषा खळदकर व राजाराम खळदकर हे शेळीला चारा पाणी देण्यासाठी गेले होते. शेळी चरत असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला करंट आल्याने त्या बॉक्सला शेळी चिकटली. व बॉक्सचा शेळीला करंट लागला. शेळीला करंट लागल्याचे पाहताच मनीषा या शेळीला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही करंट बसला. हे दृश्य पाहून त्यांचे पती राजाराम हे आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता तेही चिटकून बसले. आणि या अपघातात दुर्दैवाने शेळीसह पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भयंकर घटना नानगाव मध्ये समजताच संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे. घटना घडली त्यावेळी पाऊस पडत होता. घरातील काही व्यक्ती बाहेर गेल्यावर त्या दोघांना विजेचा धक्का बसला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांना तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.

    मृत मनीषा व राजाराम खळदकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शालेय शिक्षण घेत आहेत. घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अशीच एक घटना मागील वर्षी नानगाव जवळ असणाऱ्या दापोडी गावात घडली होती ज्यामध्ये पती, पत्नी आणि मुलगा असा तिघांचा मृत्यू झाला होता. सुनील भालेकर घरासमोरील टॉवेल वाळायला घालत असताना त्यांना शॉक बसला होता. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी प्रयत्न करत होत्या त्यांनाही विजेचा झटका बसला. त्यानंतर मुलाने प्रयत्न केला मात्र त्यालाही धक्का बसला. त्यांची एक मुलगी घराबाहेर असल्याने ती दुर्घटनेतून वाचली होती.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा