उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सोलापुरात पक्षसंघटना मजबूत ठेवण्याबाबत मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कारण त्यांच्या पक्षाचे तब्बल तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. हा पक्षप्रवेश टाळला जावा यासाठी अजित पवारांचा खास माणूस आता सोलापुरात कामाला लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालीनंतर आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुर्णी येथे एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “दत्तात्रय भरणे जरी अजित दादांना सोडून गेले तरी अजित दादांना काही फरक पडणार नाही”, अशा शब्दात पक्ष सोडू इच्छित नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. “मात्र भरणे जर सोडून जात असतील तर त्यांची समजूत घालणे गरजेचे आहे आणि यासाठीच जे नाराज नेते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार”, अशी भूमिका आज दत्तात्रय भरणे यांनी मांडली.
अजून पक्षाच्या कोणत्याही नेत्याने पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेलं नाही . जे नाराज आहेत त्याची कारणे ही छोटीशी किंवा गैरसमजमधून पुढे आलेली असतील. मात्र आम्ही त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, दुसरे माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माढ्याचे माजी आमदार बबन दादा शिंदे हे नेते भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांनंतर आता त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलो आहोत. डॅमेज कंट्रोलसाठी नाही, असा खुलासा केला. पण हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचे उघड झाले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक इच्छुकांची रांग लागली आहे. योग्य वेळी त्यांना प्रवेश देऊ”, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. “अजित दादांचे सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम असून जिल्ह्यातील नेतेही दादांवर प्रेम करतात. त्यामुळे कोणीही सोडून जाणार नाही”, असेही त्यांनी सांगितले.

