मुंबईलगत भीरा भाईंदर जवळ काशिमीरा परिसरात मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात दोन गटात मोठा राडा झाला. यावेळी 25 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर प्रताप सरनाईक यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.
दोन गटांच्या या वादात तब्बल 25 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. या राड्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिसरात जावून नागरिकांची भेट घेतली आहे. त्यांनी नेमकी काय घटना घडली याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना घटनेची सविस्तर माहिती दिली. प्रताप सरनाईक यांनी दिलेली माहिती ही अत्यंत धक्कादायक अशीच आहे. कारण या घटनेत परिसरातील महिला आणि मुलींची छेड आरोपींनी काढल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“माशाचा पाडा या परिसरामध्ये आज सकाळी काही गुंडांनी या परिसरातील आमच्या आया-बहिणींची छेड काढली. गुडांनी एका लहान मुलीची देखील छेड काढण्याचा प्रयत्न केला. मी त्या मुलीला पोलीस ठाण्याला पाठवलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सूचना मी पोलिसांना केलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल होईलच. पण लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. ही लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे”, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला.
“या परिसरात गांजा, चरस सारखे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात, असं सांगितलं जातं. पोलिसांनी आठ दिवसांपूर्वीच एक किलो गांजा या परिसरातून हस्तगत केला होता. पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे. तरीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं एवढ्या मोठ्या प्रमाणात येत असतील, मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे बाहेरुन आलेले या ठिकाणी सहा-सहा हजार रुपये भरुन राहतात. बहुतेक माझ्या अंदाजानुसार काही बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर असल्याची शक्यता नाकारता येत नाही”, असा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केला.
“मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे चौकशी होईल. या परिसरात एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. त्यानुसार पोलीस चौकीची व्यवस्था करुन देतो. त्या ठिकाणी पोलीस राहतील”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
“अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्तिथी आहे. गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 1 किलो अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केलं. दुर्दैव आहे की, मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा सापडत असेल, बाहेरच्या राज्यातून आलेले लोक या ठिकाणी अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात. काही लोकांनी आरोप केला आहे की, आरोपींना तडीपार केलं जातं आणि ती लगेच दुरही केली जाते”, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

