• Tue. Jun 16th, 2026

    Amol Mitkari: सुनेत्रा पवारांची राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची चर्चा; हा अजितदादांचा दरारा असणारा पक्ष, मिटकरींची अस्वस्थता उघड

    Amol Mitkari: सुनेत्रा पवारांची राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची चर्चा; हा अजितदादांचा दरारा असणारा पक्ष, मिटकरींची अस्वस्थता उघड

    Amol Mitkari: पार्थ पवार यांना आवरणारे आता कुणीच उरले नसल्याची भावना पक्षात प्रबळ होते आहे. त्यामुळे अनेकांना भवितव्याची चिंता सतावत असल्याचे उघड बोलले जाऊ लागले आहे.

    अमोल मिटकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राणा यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारिक पुणे मतदारसंघातून पक्षाबाहेरील विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता पक्ष सोडून भाजपत गेलेल्या नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींनी पक्षातील सगळेच ज्येष्ठ नेते अत्यंत संतप्त झाले आहेत.

    या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक आहेत. मात्र आता राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीतील सर्व निर्णय प्रक्रियेवर पार्थ पवार यांच्याच चौकडीचा प्रभाव असल्याचे पक्षात उघड बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल पटेल यांचे नाव परस्पर हटवले गेल्यानंतर पटेल हे पक्षात फारसे सक्रीय दिसत नाहीत. सुनील तटकरे हे प्रचंड नाराज असून नाराजांची ही यादी दिवसेंदिवस वाढतच आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे नियम बदलले; जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार, महसूल विभागाचा मोठा निर्णय
    या जागेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही ८ जून असून ती आपल्यालाच मिळावी यासाठी पक्षातील विविध नेत्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. अखेर ही उमेदवारीची पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०१९मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष अर्ज भरून खासदार झालेल्या राणा २०२४मध्ये भाजपमध्ये गेल्या व त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी अलिकडेच भाजपच्या नेत्यांशीही संपर्क साधला असता रिक्त जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यातली असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार, पवार यांची भेट घेतल्याचे समजते.

    बाळ माने यांच्या माघारीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर

    मिटकरी यांची थेट पोस्ट
    पक्षात असलेली ही खदखद विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स समाजमाध्यमांवर बोलून दाखवली. ‘सुनेत्रा वहिनींची राज्यसभेची रिक्त जागा ही फक्त राष्ट्रवादीचीच आहे, यावर दुसऱ्या कुणी हक्क सांगून मोर्चेबांधणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादा नावाचे अधिष्ठान आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी घेतील तोच निर्णय अंतिम राहील. हा पक्ष अजितदादांचा दरारा असणारा पक्ष आहे’, असे लिहित त्यांनी पक्षातील असंख्यांची अस्वस्थता उघड केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा