Nashik Crime: नाशिकच्या सातपूर येथील गोळीबार प्रकरणात राजकीय नेत्याच्या कार्यालयात एक सिनेस्टाईल भुयार आढळून आलं आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोंढे आणि इतर संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून भुयाराचा उद्देश आणि वापर याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रिपाईचे नेते तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्यासह गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी एकूण 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. आज दिनांक याप्रकरणी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह अन्य सात संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि संतोष पवार ,अमोल पगारे ,देवेश शिरताटे व शुभम गोसावी यांना 14 ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलिसांनी आज प्रकाश लोंढे यांच्या संपर्क कार्यालयाची झडती घेतली असता या कार्यालयामध्ये पोलिसांना एक सिनेमा स्टाईल भुयार सापडले आहे.
संपर्क कार्यालयात असलेल्या भिंतीवर शोकेश बनवण्यात आलेले आहे आणि याच शोकेशमध्ये एक छुपा दरवाजाही बनवण्यात आला होता. हा छुपा दरवाजा लक्षात देखील येणार नाही अशा पद्धतीने तो बनवण्यात आला आहे. त्यानंतर हा दरवाजा उघडल्यानंतर पुढे हे भुयार आहे. या भुयाराचा शोध पोलिसांनी तपास करत असताना लावला आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरात अशा प्रकारचे भुयार सापडल्याने खळबळ उडाली असून हे भुयार नेमके का आणि कशासाठी बनवण्यात आले आहे, हे भुयार बनवण्यामागचा नेमका उद्देश काय, याबाबत पोलिसांकडून गोळीबार प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील एका बारबाहेर झालेल्या राड्यानंतर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. काही तरुणांमध्ये झालेला वाद मिटवणाऱ्या ‘बाउन्सर्स’ला धक्काबुक्की झाल्यानंतर उद्भवलेल्या राड्यातून रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास गोळीबार झाला होता.

