Beed crime news: बीडमध्ये घरकुल बांधकामावरून महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील कारी येथील रहिवासी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झाली होती. मंजूर झालेल्या जागेवर जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू असताना, गावातील काही व्यक्तींनी त्यास विरोध केला. “आमच्या शेजारी घर बांधायचे नाही,” असे म्हणत आरोपींनी उषा वावळकर यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात वावळकर यांना जबर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रसंगावधान राखून आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. यानंतर त्यांनी थेट दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला व आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
ॲट्रॉसिटी ॲक्ट
उषा वावळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारी ग्रामपंचायतचे सदस्य दादाराव दामोदर मोरे, दामोदर मोरे, कोंडीबा भाऊराव मोरे, शिवाजी भाऊराव मोरे, कृष्णा दामोदर मोरे आणि कैलास कोंडीबा मोरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवला आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने नवरात्रीनिमित्त कन्या पूजन कसं केलं?
परिसरात तणावाचे वातावरण
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सुदैवाने, उषा वावळकर यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

