• Mon. Jun 15th, 2026

    ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ : निर्यात क्षेत्रातील उद्योजकांचा होणार सन्मान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 11, 2025
    ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ : निर्यात क्षेत्रातील उद्योजकांचा होणार सन्मान – महासंवाद

    मुंबई, दि. 11 : राज्यातील उद्योजकांनी त्यांच्या अप्रतिम कार्यक्षमतेच्या आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाच्या बळावर जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी हॉटेल ताज लँड्स एंड, मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

    सन 2022-23 आणि 2023-24 या वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 67 उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 46 सुवर्ण पुरस्कार, 17 रौप्य पुरस्कार आणि चार प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारांची निवड आठ श्रेणींमध्ये करण्यात आली असून त्यात निर्यातदार- मोठे उत्पादक घटक, सूक्ष्म, लघु व मध्यम उत्पादक, व्यापारी निर्यातदार, मान्यताप्राप्त निर्यात गृह, व्यापार गृह, लघु उत्पादक निर्यातदारांसाठी प्रादेशिक पुरस्कार, राज्य शासनातील महामंडळे आणि सेवा निर्यातदार यांचा समावेश आहे.महाराष्ट्र निर्यातीमध्ये अग्रगण्य महाराष्ट्राने देशाच्या निर्यातीमध्ये आपले अग्रगण्य स्थान कायम राखले असून, 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याची निर्यात ₹5.57 लाख कोटी आहे. ही भारताच्या एकूण निर्यातीच्या सुमारे 15.05 टक्के आहे. राज्यातील पुणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे आणि रायगड हे पाच जिल्हे निर्यातीत आघाडीवर आहेत. या जिल्ह्यांचा राज्याच्या एकूण निर्यातीमध्ये 73 टक्के वाटा आहे.

    महाराष्ट्रातून प्रामुख्याने अमेरिका, यु.ए.ई, हाँगकाँग, बेल्जियम, युनायटेड किंगडम, चीन, सौदी अरेबिया, नेदरलँड्स, जर्मनी आणि मेक्सिको या देशांमध्ये रत्ने व आभूषणे, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत घटक, रसायने आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांतील वस्तूंची निर्यात केली जाते.

    ‘महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण 2023’

    निर्यात वाढीसाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण 2023’ अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या धोरणांतर्गत आर्थिक प्रोत्साहने, पायाभूत सुविधा विकास, संस्थात्मक सहाय्य, औद्योगिक क्लस्टरचा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभाग आणि लॉजिस्टिक साखळी सुधारणा यांसारखे अनेक लाभ दिले जात आहेत.

    “एक जिल्हा एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांमधून 72 उत्पादने निवडली असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीकरिता प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्यासाठी विशेष सहाय्य दिले जात आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकांच्या सन्मानामुळे महाराष्ट्रातील उद्योग जगताला नवे बळ मिळून नवउद्योजकांना प्रेरणा मिळणार आहे. आगामी वर्षाच्या निर्यात पुरस्कारासाठी निर्यातदारांनी अधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन उद्योग विभागाने केले आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed