विधानसभा निवडणुकीला 20 हजार मतदान बाहेरुन आणलं, असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. कारण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली होती. लोकसभेत महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा मूड हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच असेल असं मविआ नेत्यांना वाटत होतं. दुसरीकडे महायुतीकडून लाडकी बहीण योजना सारख्या योजनांचं उदाहरण दिलं जात होतं. महायुतीचे मंत्री राज्यभरात शासन आपल्या दारी सारखे कार्यक्रम करताना बघायला मिळाले होते. त्यामुळे निकाल काय लागेल? याबाबत उत्सुकता होती. विशेष म्हणजे तसाच अनपेक्षित निकालही लागला. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. तर महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या निवडणुकीनंतर विरोधकांकडून व्होट चोरीचा आरोप केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर याबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली आहे. विरोधकांकडून इतकं रान पेटवलं जात असताना आता सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला स्वत: एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं. हे वक्तव्य केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला. यानंतर विलास शिरसाट हसत बोलू लागले. त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.
विलास भुमरे यांच्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदार बाहेरून आणले, असं वक्तव्य विलास भुमरे यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारव करत मतदान बाहेरुन आणले म्हणजे स्थलांतरीत केल्याचं ते म्हणाले.
विलास भुमरे नेमकं काय म्हणाले?
“विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जवळपास 20 हजार मतदान मी बाहेरुन आणलं. मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो”, असं वक्तव्य विलास भुमरे यांनी केलं.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
विलास भुमरे यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “विलास भुमरे यांनी 1 लाखाची मदत शेतकरी आत्महत्याला दिली. ती बातमी लावा. 20 हजार मतदाराचा त्यांनी खुलासा देखील केला. त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर जी नावे गेलेली आहे ती त्यांनी आणली. त्यांनी खुलासाही केला. चांगली बातमी तुम्ही दाखवत नाही. उद्धव ठाकरे सेनेचे लोक आले होते की शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला एक लाख पाठवते त्यांनी दिले नाही. त्याच कुटुंबाला विलास भुमरे यांनी 1 लाख रुपये पाठवले, बांधिलकी जपणाऱ्या माणसासोबत तरी असे करू नका”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा