शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारत भाजवर निशाणा साधला.
“मला असं वाटतं की, कदाचित मोहन भागवत यांना सांगता येत नसेल. आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला तर ब्रह्मराक्षस झालेला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “मी मुद्दामून तुम्हाला सांगतो, ब्रह्मराक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जावून गूगलवर ब्रह्मराक्षस हा शब्द बघा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आमच्या अंगावर हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवत यांची गेल्या काही वर्षांपासूनची वाक्य आहेत. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यांनी हिंदू-मुस्लीम यांच्यातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत, त्यांना विचारतोय, मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडलं हे बोलायची तुमची हिंमत आहे का? 2022 ची बातमी आहे की, मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर मुसलमानांचे सर्वोच्च नेते उमर अहमद इलासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा की, ते हिंदुस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले की पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले”, असंही ते म्हणाले.
“आमच्या अंगावर येता? अरे तुम्हाला लाज, लज्जा, शरम आहे की नाही? एकतर काहीतरी ठरवा. अमिबा यासाठीच बोललो की, ना आकार ना उकार. कसाही वाढतोय आणि कसाही पसरतोय. हे एवढ्या पुरता थांबत नाही. मोहन भागवत बोलले आहेत, या देशात राहतो तो प्रत्येकजण हिंदू आहे. मग त्यांचे चेले चपाटे करत आहेत हिंदू-मुस्लीम करत आहेत. आम्ही परत सांगतो, हा देश जो स्वत:चा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी यांना भाजपवाले पाकिस्तान्यांचे दहशतवाद्यांची बहीण म्हणाले होते. ती सोफिया कुरेशी आमच्या सगळ्यांती बहीण आहे हे आमचं हिंदुत्व आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं.
राज ठाकरे दसरा मेळाव्यात गैरहजर, सोबत येणार की नाहीत? उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा
“काहीतरी दिशा ठरवा. कुठे जायचं ते ठरवा. कारण एकीकडे तुम्ही सोफिया कुरेशा यांना तुम्ही पाकिस्तान्यांची बहीण म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांची स्वागत मिरवणूक काढत आहात त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत की, मुस्लिम महिलांकरुन रक्षाबंधन करुन घ्या. नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहेत. नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वत:चं तपासून घ्या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहात. आशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धा बरोबर करतो तो माणूस बेशरम आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

