सांगली, दि. 25 – दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करावा अशी आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी प्रार्थना केली आहे. दुष्काळी भागाला अधिकाधिक निधी देऊन, या भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे बिरोबा दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. 2014 पासून टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या योजनेची बरीच कामे पूर्ण होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळू लागले आहे. दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील या दिवंगत नेत्यांसह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. टेंभू योजनेसाठी नाबार्ड मधून 617 कोटी रुपये मंजूर आहेत. तसेच म्हैसाळ योजनेसाठी 919 कोटी रुपये मंजूर आहेत. टेंभू विस्तारित योजनेचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करू. तसेच येत्या एक ते दोन वर्षात उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच येथील विविध मागण्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.

भूडच्या वितरण हौदाची पाहणी
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प टप्पा पाच अंतर्गत खानापूर तालुक्यातील भूड येथील वितरण हौदाची जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव आदी उपस्थित होते.

गोरेवाडी डाव्या व उजव्या कालव्यावरुन तासगांव, खानापूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील ६,०१० हे. क्षेत्रास बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेद्वारे पाणी देण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही भेट देऊन पाहणी केली.

पंपगृह टप्पा क्र.५ मधून उर्ध्वगामी नलिकेद्वारे पाणी बलवडी येथील वितरण हौदामध्ये सोडण्यात येते. बलवडी वितरण हौदामधून गोरेवाडी उजवा कालवा, गोरेवाडी डावा कालवा व भूड देविखिंडी कालवा हे तीन कालवे निघतात. टेंभू विस्तारीत प्रकल्पांतर्गत गोरेवाडी डाव्या कालव्यास समांतर गोरेवाडी डावी थेट गुरुत्व नलिका प्रस्तावित केलेली आहे. या नलिकेद्वारे तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ५४८२ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावीत आहे.
गोरेवाडी उजव्या कालव्याच्या शेवटापासुन वायफळे बिरणवाडी वितरीका निघते. या वितरीकेद्वारे खानापूर व तासगाव तालुक्यातील ४९८ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे.
०००००
