• Fri. Mar 6th, 2026
    मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ पाच जिल्ह्यांत अलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?

    Maharashtra Weather Update: अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यात खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. जवळपास सात ते आठ लाख हेक्टवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    rain alert news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात दोन दिवसानंतर मध्यम स्वरुपातील पाऊस सुरू झाला आहे. नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांना शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नांदेड शहर परिसरातील जुना पूल येथे गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग कायम सुरू आहे.

    शेतात पाणी साचल्यामुळे पिके हातची गेली आहेत. पावसाने दोन दिवस उघडीप दिल्यानंतर शुक्रवारी पुन्हा हजेरी लावली आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपातील सरी कोसळल्या आहेत. विभागात ढगाळ वातावरण असून बीड, हिंगोली, जालना, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला आहे.
    Maharashtra Timesधक्कादायक! सप्तशृंगी माता मंदिराजवळ पत्ता विचारला अन् अडीच तोळ्यांचे दागिने लंपास
    लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निवळत आहे. मात्र, शेतात पाणी साचलेले असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. तसेच नुकसानाची निश्चित आकडेवारी कळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दोन दिवस तुरळक पाऊस झाला असला तरी २७ (शनिवार) आणि २८ (रविवार) सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसणार आहे. जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.
    Maharashtra Timesतीन महिन्यांपूर्वी बाळाच्या जन्माचा आनंद काळाने हिरावला; दुचाकीवरुन निघालेल्या तरुणासोबत अनर्थ, चिमुकल्याचं पितृछत्र छत्र हरपलं
    दरम्यान, कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. गावांना पुराने वेढा घातल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय पातळीवर पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. घरांची पडझड आणि शेतीचे नुकसान झाल्यामुळे ग्रामीण भागात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे मराठवाड्याचे अर्थचक्र ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: रस्तेकामात आपलं घर जाणार… भीतीने तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन; चिकलठाण्यात चक्का जाम आंदोलन
    शुक्रवारी जोर ओसरला
    गेल्या २४ तासांत म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत नऊ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २५.३ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड १६.९, धाराशिव ११.२, परभणी ९.९, बीड ५.४, हिंगोली ३.१, छत्रपती संभाजीनगर २.२ असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा