पुणे
कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) याने आपल्या दहशतीच्या जोरावर सय्यदनगर परिसरात तयार केलेल्या अनधिकृत बांधकामांचे जाळे पोलिसांनी अखेर मोडित काढले आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने पोलिसांनी टिपू पठाणने बांधलेले बेकायदेशीर ऑफिस, टपरी आणि अतिक्रमणे आज २६ सप्टेंबरला जमीनदोस्त केले आहेत.
पोलिसांना अतिक्रमणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर सय्यदनगरमधील ख्वाजा मंजील इमारतीवर बांधलेले अनधिकृत ऑफिस व टपरी यावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
ही संयुक्त मोहीम पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, उप-आयुक्त (परिमंडळ ५), सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली हाती घेण्यात आली. कारवाईसाठी काळेपडळ पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग सक्रिय होता.
