Nashik Crime: नाशिकच्या पंचवटीत झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांसोबत बैठक घेऊन गोळीबाराचा कट रचल्याचा सदर माजी नगरसेवकावर आरोप असून या घटनेतील राजकीय संबंध उघड होण्याची शक्यता आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा नाशिकच्या पंचवटी भागात सागर जाधव (वय,३५ ) याच्यावर गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील जवळजवळ ११ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातच आता मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार राहुलवाडी, फुलेनगर येथील सागर जाधव गोळीबार प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरुन पंचवटी पोलिसांनी भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील याला आज अटक केली आहे.
‘जो ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणार नाही त्याला धडा शिकवा’, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
याआधी देखील नांदूर नाका येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धवबाबा निमसे यांना पोलिसांनी अटक केलेली असताना, आज मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये असताना पुन्हा भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना सागर जाधव गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. भाजपच्या दुसऱ्या माजी नगरसेवकाचा गोळीबारसारख्या गंभीर प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरुन नाशिक पोलिसांनी अटक केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या गोळीबार प्रकरणात आगामी काळात आणखी कोणाचे नावे समोर येतात आणि आरोपींरव काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

