Solapur Crime News : सोलापूर पोलिसांनी शहरातील गुंडांवर तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी आणि त्याच्या मुलाला तडीपार करण्यात आले होते. कुरेशीने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने कुरेशीला मोठा दंड देखील ठोठावला आहे. कुरेशीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
न्यायालयाच्या निर्णयामुळे गाव गुंडांना जबर धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीअगोदर इब्राहिम कुरेशीला दोन वर्षांकरिता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले होते. इब्राहिम कुरेशी हा सोलापूर शहरातील माजी नगरसेवक असून आगामी काळात इब्राहिम कुरेशीला नगरसेवक निवडणुकीत नशीब आजमावयाचे आहे, त्यामुळे कुरेशीची धडपड सुरू होती.
जोरजोराने ओरडले, शटरला डोकं आपटलं, आमदाराच्या घराजवळ गोंधळ, पोलिसांना गोळी घालण्याची धमकी; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा प्रताप
इब्राहिम कुरेशीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे
पोलीस आयुक्त कार्यालया मार्फत 6 ऑगस्ट 2025 रोजी इब्राहिम कुरेशी आणि त्याचा मुलगा अलीम कुरेशीवर तडीपारची कारवाई झाली होती. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. कुरेशी पितापुत्रा विरोधात सन २००९, २०१५, २०१६, २०१८, २०२१ व २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, जनावरांची निर्दयतेने, क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल होते. सदर बाजार पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वये तडीपारीची कारवाई केली होती.
पोलीस आयुक्तांनी माध्यमांना दिली माहिती
इब्राहिम कुरेशी याने सोलापूर पोलिसांकडे प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सोलापूर पोलिसांकडे तीन महिन्यांची स्थगिती मागितली होती. उच्च न्यायालयाने सोलापूर पोलिसांना मत मांडण्यास सांगितले. सोलापूर पोलिसांकडून एसीपींनी बाजू मांडली. त्यांनी कारवाई अहवाल कोर्टासमोर सादर करून त्यात स्पष्ट केले होती की आम्ही तीन महिन्यांची स्थगिती दिलेली नाही. परंतु त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यास वेळ दिलेला आहे. हीच गोष्ट आमच्यापासून का लपवली? असा सवाल करून न्यायालयाने इब्राहिम कुरेशी या गोतस्करी करणाऱ्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला, आणि याची वसुली सोलापूर जिल्हाधिकारी करतील असा निर्णय दिला, याबाबत अधिकृतपणे माहिती सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

