• Sun. Mar 8th, 2026
    दारू पिताना तिघांचा वाद, भांडण विकोपाला गेलं आणि अनर्थ घडला; दोघांनी तिसऱ्याला संपवलं; छत्रपती संभाजीनगरात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी हत्या केली. दारू पिण्याच्या नादात वर्चस्वावरून झालेल्या वादानंतर हे भयंकर कृत्य घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरात दोन मित्रांच्या मैत्रीचा दुर्दैवी अंत झाल्याचं समोर आलं आहे. दारू पिण्यासाठी बसलेल्या मित्रांमध्ये वर्चस्वावरून वाद झाला. यावेळी दोघांनी सोबतच्या मित्रावर गावठी कट्ट्याने गोळीबार करत तिसऱ्या मित्राची हत्या केला. ही खळबळजनक घटना गंगापूर तालुक्यात भिवधानोरा येथे घडली. यातील एका आरोपीला पोलिसांनी नेवासा फाटा येथून बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    तिघांच्या मैत्रीतील वादाने टोक गाठलं

    राहुल रमेश नवथर, वय ३५, राहणार गळनिंब, तालुका गंगापूर, असं मृत तरुणाचं नाव आहे. तर कानिफनाथ मावस, योगेश कल्याण नागे, राहणार भिवधानोरा अशी आरोपींची नावं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल आणि त्याचे दोन मित्र कानिफनाथ व योगेश हे तिघे मिळून विवधानोरा शिवारातील गट क्रमांक ३०६ येथे शेतात दारू पिण्यासाठी गेले होते.

    दोघांनी मिळून मित्राला संपवलं

    दारू पीत असताना तिघांमध्ये वर्चस्वावरून वाद झाला. या वादाने टोक गाठलं. वाद इतका विकोपाला गेला, की कानिफनाथ मावस आणि योगेश नागे या दोघांनी मिळून राहुल याच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला. एक गोळी बरगडी, दुसरी खांद्यावर तर तिसरी गोळी पोटात मारल्याने यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत आरोपींचा शोध घेतला.

    नेवासा फाटा येथे एकाला बेड्या

    या प्रकरणातील आरोपीचा पोलीस शोध घेत असताना आरोपी योगेश नागे हा पुण्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी नेवासा फाटा येथून योगेशला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान ही हत्या वर्चस्व वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा