Pune Budhwar Peth: पुण्यात बुधवार पेठेत एका तरुणाला तीन महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली. पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्यानंतर ही मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (12 सप्टेंबर) रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी परिसरातील तमन्ना शाहरुख मुलाना ( वय 32), तसेच बुधवार पेठेतील तनुजा हकीमअली मौल्ला (वय 34) आणि सोनिया गुलाम शेख (वय 32) अशा तीन महिलांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Pune News : लाल रंगाच्या स्विफ्टच्या संशयास्पद हालचाली, नाकाबंदी लावली अन्…; पोलिसांकडून त्या रॅकेटचा पर्दाफाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण पुण्यातील बुधवार पेठेतील एका इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली. ठरल्याप्रमाणे पैशांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. मात्र, पेमेंट अॅपचा पासवर्ड आठवत नसल्यामुळे तरुणाकडून रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून तरुण आणि तमन्ना यांच्यात मोठा वाद सुरु झाला.
सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ केली. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. नंतर तनुजा आणि सोनिया या दोघीही तिथे आल्या. तिघींनी मिळून फिर्यादीला धक्काबुक्की केली आणि त्याला चोप दिला. या प्रकारानंतर जखमी तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून बुधवार पेठ परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

