• Mon. Mar 9th, 2026

    Pune News: प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; पुणे रेल्वे स्थानकावर उघड्यावर पदार्थांची विक्री, प्रशासनाचे दुर्लक्ष

    Pune News: प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; पुणे रेल्वे स्थानकावर उघड्यावर पदार्थांची विक्री, प्रशासनाचे दुर्लक्ष

    Pune News: संबंधित सर्व हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल रेल्वे प्रशासन व आयआरसीसीटीचे अधिकृत असताना त्यांच्याकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन करतेय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    pune station food(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील हॉटेल व स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ उघडे ठेवून त्याची प्रवाशांनी विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढली असताना उघड्यावरील अन्नपदार्थ विक्री प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे चित्र आहे.

    मध्य रेल्वेतील पुणे स्थानक महत्त्वाचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणाहून दररोज दीडशेपेक्षा जास्त गाड्या धावतात, तर दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पुणे रेल्वे स्थानक येथे एकूण सहा फलाट आहेत. या फलाटांवर रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीने अधिकृत नेमलेले हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियम पाळून खाद्यपदार्थांची विक्री करावी, असा नियम आहे. मात्र, पुणे रेल्वे स्थानकावरील अनेक स्टॉलवर वडापाव, समोसा व इतर काही पदार्थ तयार करून उघड्यावर ठेवलेले असतात.
    Maharashtra Timesपुणेकरांसाठी म्हाडाची बंपर लॉटरी; तब्बल ‘इतक्या’ घरांची सोडत जाहीर, कसा अन् कुठे कराल अर्ज?
    प्रवाशांनी खाद्यपदार्थांची मागणी केल्यास तेच पदार्थ विकले जातात. त्यामुळे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे स्टॉलची तपासणी केली जाते; तसेच अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र, प्रशासनाला हा प्रकार कसा दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
    Maharashtra TimesAjit Pawar: अष्टविनायक मंदिरांची कामे दर्जेदार व्हावीत; अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
    रेल्वे स्थानकावर प्रवाशांना खराब पदार्थ विकण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. याबाबत प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात. त्यानुसार रेल्वे प्रशासन कारवाई करीत आहे. आता उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याबद्दलही कारवाई केली जावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

    रेल्वे फलाटावर निकृष्ट अन्न मिळते, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाची मदत घेऊन या प्रकारांवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, अजूनही त्यामध्ये सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे अशी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने रद्द करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. –आनंद सप्तर्षी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा