Success Story of Rugby Player : नंदुरबारच्या प्रणव गावितची १८ वर्षांखालील भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे. आदिवासी भागातून आलेल्या प्रणवने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवले आहे. शालेय स्पर्धेत निवड झाल्यानंतर त्याने उत्तम कामगिरी केली. आईच्या कष्टाचे चीज करत त्याने हे यश संपादन केले. त्याच्या निवडीमुळे नंदुरबारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नंदुरबार तालुक्यातील वाघाळे हे आदिवासी गाव आहे. प्रणव गावित लहान असताना त्याचे वडील विलास गावित यांचे निधन झाले. त्याची आई नेहा विलास गावित या आश्रम शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याला लहानपणी नंदुरबार शहरातील एस.ए.मिशन शाळेत टाकले. त्या ठिकाणी असलेल्या मिशनच्या वसतिगृहात तो राहू लागला. शिक्षण घेत असताना त्याला प्रशिक्षक खुशाल शर्मा यांनी मार्गदर्शन केले. त्या दरम्यान प्रणवला रग्बीबद्दल आवड निर्माण झाली. इयत्ता आठवीमध्ये असताना शालेय रग्बीचा मुलांचा संघ निवडत असताना संघात एक खेळाडू अनुपस्थित राहिल्यामुळे ऐनवेळी प्रणवची निवड संघात करण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोन करून भारतीय संघात स्थान मिळवले. जिल्हास्तरिय संघापासून भारतीय संघापर्यंतची प्रणवच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे.
आईला घरच्या कामांमध्ये मदत करून दररोज नियमित खेळाचा सराव, तसेच फिटनेस प्रॅक्टिस आणि विविध स्पर्धेचा अनुभव घेत गेल्यामुळे,प्रचंड जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रणव भारतीय संघात निवडला गेला आहे.
सन 2022-23 मध्ये शाळेच्या सतरा वर्षातील संघाला शालेय स्पर्धा मध्ये कांस्यपदक मिळवून दिले. तर 2023-24 मध्ये कोल्हापूर येथे संघाला रजत पदक प्राप्त करून चांगल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुन्हा कांस्यपदक प्राप्त केले. सतत उत्कृष्ट कामगिरी मुळे बिहार येथे झालेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2025’ मध्ये पुन्हा कांस्य पदक प्राप्त केले. या कामगिरीसाठी शासनातर्फे दोन लाख रुपये स्कॉलरशिप सुद्धा लवकरच मिळणार आहे.
कोलकत्ता येथे एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान सॉल्ट लेक या स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात 25 खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यांना 26 ते 30 ऑगस्टमध्ये मलेशिया येथेही प्रशिक्षण पूर्व सरावासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या अंतिम बारा मुलांमध्ये प्रणव गावित याची निवड झाली.
13 व 14 सप्टेंबर दरम्यान हॉहहॉट चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेसाठी हा संघ दहा सप्टेंबर रोजी रात्री कोलकात्याहून थेट होहहॉट, चीन येथे रवाना झाला. घरची परिस्थिती बिकट असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी व खुशाल शर्मा यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. अनेक अडचणीवर मात करीत आदिवासी बहुल जिल्ह्यातून प्रणव याने 18 वर्षाखालील रग्बी च्या भारतीय संघात स्थान मिळवल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून युवकांसाठी तो आदर्श ठरत आहे. महाराष्ट्रातून प्रणव हा एकमेव खेळाडू आहे.

