धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत आज जाहीर झाले. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी खुले झाले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी सत्ता होती. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने सत्ता हस्तगत केली.
भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा आहेत. पण त्यांच्या नावाने भावी जिल्हा परिषद अध्यक्षा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून याबाबतची पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. तर माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामुळे अर्चना पाटील विरुद्ध ज्योती सावंत अशी अध्यक्ष पदासाठी स्पर्धा भविष्यात पाहायला मिळू शकते. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच शिंदे गटाकडून ज्योतीताई सावंत जिल्हा परिषद भावी अध्यक्षा अशी पोस्ट व्हायरल केली गेली आहे.
‘आपल्या माऊली अध्यक्ष होणार’, मल्हार पाटलांची पोस्ट
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अर्चनाताई पाटील यांचा फोटो वापरून आपल्या माऊली अध्यक्ष होणार, लागा कामाला, अशी भावनिक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून एकच राळ उठवून दिली. तर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी धनंजय सावंत आणि ज्योती सावंत यांचा एकत्र असलेला फोटो व्हायरल करत जिल्हा परिषद भावी अध्यक्षा अशी पोस्ट व्हायरल करून राळ उठवून दिली.
महाविकास आघाडीच्या वतीने अद्याप तरी कोणाचे नाव जाहीर केले नाही किंवा कोणाचाही फोटो व्हायरल केला नाही. अद्यापपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हे सुद्धा त्यांनी जाहीर केले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली नाही.
धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप तसेच फेसबुकवर अर्चनाताई पाटील आणि ज्योतीताई सावंत हे जिल्हा परिषद भावी अध्यक्षा अशा पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. भविष्यात कोण अध्यक्ष होईल हे आता काळच ठरवेल.

