• Thu. Mar 12th, 2026

    पुणे गँगवॉर : ‘मलाही गोळ्या घाला’; गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीला धायमोकलून रडला, पुत्राला अग्नीडाग देताना म्हणाला…

    पुणे गँगवॉर : ‘मलाही गोळ्या घाला’; गणेश कोमकर मुलाच्या अंत्यविधीला धायमोकलून रडला, पुत्राला अग्नीडाग देताना म्हणाला…

    Pune Gangwar : आयुष कोमकर याच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पॅरोलवर सुटलेला आयुषचा पिता गणेश कोमकर हा देखील आला होता. यावेळी गणेश कोमकर याने प्रचंड आक्रोश केला. त्याच्या आक्रोशाने वातावरण प्रचंड शोकाकूल झालेलं बघायला मिळालं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : आंदेकर-कोमकर कुटुंबातील टोळी युद्धात आयुष कोमकर या 20 वर्षीय निष्पाप तरुणाचा बळी गेला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने बंडू आंदेकरच्या टोळीने त्याच्या सख्या नातवाची हत्या केली. आंदेकर कुटुंब गेल्या 5 दशकापासून गुन्हेगारी विश्वात आहे. ही गुन्हेगारी आता कुटुंबापर्यंत येऊन पोहोचली. कुटुंबातल्या कुटुंबात रक्तरंजित असे वाद बघायला मिळत आहेत. गेल्या वर्षी सख्या बहिणीने वनराज आंदेकर यांची हत्येची सुपारी देत संपवलं होतं. त्यानंतर आता आंदेकर गटाने कोमकर कुटुंबातील तरुण मुलाची हत्या केली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. असं असताना आंदेकर गटाने गणेश कोमकरच्या मुलाला टार्गेट केलं. आंदेकर टोळीने 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता क्लासमधून घरी आलेल्या आयुष कोमकरची हत्या केली. आयुषच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचा पिता गणेश कोमकर आला होता. यावेळी गणेशने आपल्या मुलाचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला.

    आयुष कोमकरच्या हत्येनंतर त्याचा पिता गणेश कोमकर हा पॅरोलवर सुटला आहे. आयुषच्या मृत्यूनंतर कोणताही घातपात होऊ नये यासाठी केवळ गणेश कोमकरला मुलाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली होती. गणेश हा नागपूरच्या कारागृहात कैदेत होता. त्याला पोलिसांच्या बंदोबस्तात पुण्यात आणण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला. तसेच पुण्यात गणेश विसर्जनाच्या बंदोबस्त पोलीस जबाबदारी पार पाडत होते. यामुळे आयुषच्या मृतदेहावर तीन दिवसांनी आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

    आयुष कोमकरचे पार्थिव आज वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळी स्मशानभूमीत आयुषचे भावंड, कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईक आले होते. आयुष्यच्या भावाने यावेळी प्रचंड आक्रोश केला. आयुषचा पिता गणेश येणार असल्याने अंत्यविधी थांबवण्यात आले होते. थोड्या वेळाने पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर आला. यावेळी स्मशानभूमी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. कोणताही घातपात घडू नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली.

    गणेश कोमकर स्मशानभूमीत आल्यानंतर त्याने टाहो फोडला. त्याने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलाची काय चूक होती? असा सवाल तो रडताना करत होता. यावेळी त्याने आपल्या मुलाने दिलेली खास गिफ्ट आणलेली होती. आपण जेलमध्ये असताना आयुषने आय लव्ह यू पप्पा लिहिलेलं भेटकार्ड पाठवलेलं होतं. या भेटकार्डमध्ये आयुष आणि त्याच्या वडिलांची लहानपणापासूनची फोटो होती. हे भेटकार्ड पाहून गणेश धायमोकलून रडत होता. त्याचा आक्रोश पाहून इतर नातेवाईकदेखील रडत होते. यावेळी वातावरण अत्यंत शोकाकूल झालेलं होतं.

    “बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी, असं म्हणत गणेशने हंबरडा फोडला. माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला”, असं गणेश कोमकर रडत-रडत बोलत होता. “माझी चूक नसताना माझ्या मुलाला हे का भोगावं लागलं?”, असंही गणेश कोमकर रडताना पोलिसांना विचारत होता.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा