Baramati News : बारामतीत भिगवण रस्त्यावर गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ती जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण जखमी झाली. तिच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
बारामती भिगवण रस्त्यावर ऊर्जा भवननजीक हा अपघात रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. या घटनेत शरयू संजय मोरे 22 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
शरयू मोरे ही तिच्या एका मैत्रिणीसह दुचाकीवरून शनिवारी रात्री बारामतीतून एमआयडीसी परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाकडे निघाली होती. भिगवन रस्त्यावरील ऊर्जा भवन नजीक तिची दुचाकी आली असता, ऊर्जा भवन नजीकचा गतिरोधकाचा अंदाज तिला आला नाही आणि तिची दुचाकी डिव्हायडरला धडकली. यात दुचाकी चालवणाऱ्या शरयूचा जागीच मृत्यू झाला तर तिची दुसरी मैत्रीण जखमी झाली.
शरयू ही वैद्यकीय पदवीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होती. तिचे वडील सांगली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करतात. पुढील एका वर्षात ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार होती. मात्र तोपर्यंत तिच्यावर काळाने घाला घातला.
वर्ध्यात देखील असाच भीषण अपघात झाला होता. गिट्टी भरून वर्धा शहराकडे येत असणाऱ्या टिप्परला दुचाकीची जोरदार धडक बसली. या दुचाकी थेट टिप्परच्या समोरच्या भागात शिरली. या अपघातात १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत मुलाचे नाव निखिल प्रफुल मांडवे असून तो द्वारका नगर सावंगी मेघे येथे राहणारा आहे. अपघातात त्याच्या दोन्ही पायाला जबर मार बसला. पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

