Chandrapur Accident News: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथे महामार्गावर ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षाचा चुराडा झाला. तर, प्रवासी रिक्षामधील चार जणांचा यात जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एक गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
ही रिक्षा राजुरा शहराकडून खामोना-पाचगाव येथे जात होती. याच मार्गावर गडचांदूर येथून राजुऱ्याकडे ट्रक येत होता. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवेवर रिक्षा चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक प्रकाश मेश्राम याच्यासह पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली. प्रकाश मेश्राम (रिक्षा चालक, 48/पाचगाव), रवींद्र बोबडे (48/पाचगाव), शंकर पिपरे (50/कोची),सुभाष पिंपळकर, वर्षा मांदाडे (50/खामोना), ताराबाई पापुलवार अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी असलेल्या दोघांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या मार्गांवरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. वाहतूक नियमांची सर्वात पायमल्ली चालक करीत असतात. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

